खानिवडे : विरार शहर रालगत असलेल्या उंच डोंगरावरिल जीवधन गडावर जीवदानी आईचं मंदिर स्थित आहे. कधी काळी या शहराचं नाव एकविरा होतं, असं म्हटलं जातं. त्या काळी या मंदिराला एकविरा देवी या नावानेही ओळखलं जातं होतं. मोगल आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणांत या मंदिराला इजा पोहोचवली गेली होती. त्यावेळी काही स्थानिक लोक या डोंगरावर देवीच्या दर्शनाला येत. त्यांच्याच आस्थेमुळे देवीची महती पुढील पिढीत स्रवत गेली. (Navratri 2023)
देवीचं मंदिर वैतरणा नदीच्या तटावर पर्वतराजींच्या कुशीत वसलेलं आहे. वर्तमान काळात भाविकांत आई जीवदानी देवी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील १८ शक्तीपिठांपैकीही हे एक स्थान असल्याचं सांगितलं जातं. एका पौराणिक कथेनुसार, राजा दक्षाने पूजेदरम्यान देवाधिदेव शंकराचा अपमान केल्याने आदिशक्तीने स्वतः मला अग्रिहोत्रात समर्पित केलं होतं. आदिशक्तीचं हे शरीर शंकर घेऊन जात असताना भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, ती ठिकाणं शक्तीपीठ बनली. जीवदानी हेदेखील त्यापैकी एक स्थान होतं.
या स्थानाबाबत स्थानिक लोकांत अनेक आख्यायिकाही आहेत. त्यातीलच एक आख्यायिका अशी आहे की, येथील एका गावात एक गुराखी होता. याच डोंगराच्या पायथ्याशी तो आपली गुरे चरायला नेत असे. त्याच्या गुरांसोबत आणखी एक गाय चरायला यायची परंतु संध्याकाळ होताच ती गाय नजरे आड होत असे. एक दिवस गायीच्या मालकाच्या शोधात हा गुराखी डोंगरावर गेला….. पण गाय डोंगरावर चढताच दृष्टीआड झाली. त्याचवेळी त्या ठिकाणी एक देवी प्रकट झाली. (Navratri 2023)
गुराख्याने गाईला चरवण्याच्या बदल्यात देवीजवळ मोबदला मागितला. गुराख्याचं म्हणणं ऐकून घेत देवीने गाय कामधेनु असते. ती तुला मोक्ष प्रदान करेन, याच कथेचा शेवट काही लोक थोडा वेगळ्या प्रकारेही सांगतात. तो असा देवी दृष्टीआड झाली तसा गायीने हृदयविदारक हंबरडा फोडला आणि कड्यावरून स्वतःला झोकून दिले. या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडलेले नाही. पण तिने आपल्या जीवाचे दान केलं म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व तेथे वास करणारी आदिमाता म्हणून जीवदानी देवी प्रसिद्ध झाली.
सौम्य शीतल, प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे. तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देत आहे. त्यापूर्वी देवीची लाकडी मूर्ती होती. २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना झाली. आजही भाविकांत आई जीवदानीविषयी प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे नवसाला पावणारी देवी म्हणूनही या मंदिराची ख्याती आहे. देशभरातील देवीभक्त या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात. गेल्या काही वर्षांत येथे कायापालट झाला असून असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. (Navratri 2023)
हेही वाचा :