कोल्हापूर : अकिवाटच्या शेतकर्‍यानेच केले अडीच एकरांतील टोमॅटो उद्ध्वस्त | पुढारी

कोल्हापूर : अकिवाटच्या शेतकर्‍यानेच केले अडीच एकरांतील टोमॅटो उद्ध्वस्त

कुरूंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  तब्बल तीन महिने स्वयंपाक घरात श्रीमंतीचे स्थान मिळालेल्या टोमॅटोच्या अचानक घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटोला 5 रुपये दर मिळत असून मजूर खर्चही निघणे कठीण झाल्याने अकिवाट येथील सुभाष खुरपे या शेतकर्‍याने अडीच एकरांत केलेल्या टोमॅटोचे पीक उपटून टाकत संताप व्यक्त केला.

टोमॅटोला चांगले दिवस आल्याने टोमॅटोच्या लागवडीतून बर्‍यापैकी उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्च करून 100 हून अधिक एकरात टोमॅटोची लागवड आहे. योग्य नियोजन करून मोठे उत्पादन घेतले; मात्र टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पिकलेल्या मालासह टोमॅटोची रोपे शेतकरी तोडून टाकत आहेत.

  • जुलै महिन्यात टोमॅटोला सर्वसाधारण किलोला 250 ते 300 रुपये भाव मिळत होता. हा दर दिवाळीपर्यंत असाच राहील, असे शेतकर्‍यांना वाटले; पण आवक वाढली. परिणामी, बाजारभाव कमी होत गेला. आज लिलावात जवळपास 4 ते 5 रुपये किलोला भाव मिळाला. बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे. शिरोळ तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोची शेती करत आहेत. शेतकर्‍यांना अनेकदा चढ-उताराचा सामना करावा लागतो.

जुलै महिन्यात टोमॅटोला सर्वात उच्चांकी दर मिळत होता. हा जर दिवाळीपर्यंत राहील अशी अपेक्षा होती. म्हणून जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात 1 लाख 75 हजार रुपये खर्चून टोमॅटोची लागवड केली. उत्पादन सुरू झाले आणि दर घसरले. कामगारांचा खर्चही निघत नसल्याने चालू टोमॅटो पीक काढून टाकले.
– सुभाष खुरपे, शेतकरी

Back to top button