गजानन चौकटे, पुढारी वृत्तसेवा : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात गुलालाची उधळण अन ढोल ताशांच्या गजरात गेवराईकरांचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली. गणरायांच्या स्वागताने गणेश भक्त भारावून गेले आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने वातावरणात चैतन्य संचारले असून, अवघे शहर गणेशमय झाले आहे. घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. पुढील १० दिवस गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. (Ganesh Utsav)
संबधित बातम्या
लाडक्या गणपती बाप्पांची वाट पाहणाऱ्या भक्तांनी मंगळवारी (दि.१८) सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली. सकाळी बाप्पांची स्वारी भक्तांसोबत घरोघरी विराजमान होण्यासाठी निघाली. गणरायांचे स्वागत करण्यासाठी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. गणेशमूर्ती घेतल्यावर गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पांच्या नामाचा जयघोष केला जात होता. शहरात सर्वत्र घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना जल्लोषात करण्यात आली. नेहमीप्रमाणे यंदाही घरोघरी विराजमान होणाऱ्या बाप्पांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. 'आले आले हो गणराज आले' म्हणत प्रत्येक जण लाडक्या दैवताला घरी घेऊन गेले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे स्वागत दुपारनंतर करण्यात आले. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असल्याचे दिसले. सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील गणेश मंडळांच्या श्री गणेशाच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरू राहणार आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून गणरायाच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. बाप्पांच्या आगमनाने शहरात नवचैतन्य संचारले होते.
विघ्नहर्त्याला घरी नेताना आबालवृद्धांचा उत्साह अधिक होता. दुपारी गणेशमूर्ती नेण्यासाठी भक्तांची बाजारात झुंबड उडाली होती. शहरातील मिठाईच्या दुकानात बाप्पांसाठीचा नैवेद्य खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. जास्वंद, गुलाब, केवडा, मोगरा, शेवंती, झेंडूची फुले, दुर्वा, धूप, अगरबत्ती यासह पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी देखील भक्तांची गर्दी झाली होती. गणेशोत्सावाच्या खरेदीसाठी भक्तांच्या तुफान गर्दीने शहरातील बाजारपेठांचे रस्ते फुलले होते.
यंदा गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. शहरातील महत्वाच्या गणेश मंडळांसह तालुक्यातील इतर गणेश मंडळांनी देखील ढोलताशा पथकांना आमंत्रित करत श्रींची मिरवणूक काढली. त्यामुळे यंदा बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुकीत डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना पसंती देण्यात आल्याचे दिसले. दुपारनंतर मंडळांच्या मिरवणुकांनी शहरातील परिसर गजबजला होता. गणेश मंडळांनी केलेल्या रोषणाईमुळे संध्याकाळी शहरातील सर्व रस्ते उजळून निघाले होते. ढोलताशांच्या गजरात बाप्पांचा जयघोष करण्यात विशेषतः तरुणाईचा उत्साह अधिक होता.
यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भक्तांचा अधिक कल आहे. त्यामुळे शाडूच्या मातीच्या विलोभनीय गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. अलंकारांसहित बाप्पांची मूर्ती खरेदी करण्याकडे भक्तांचा कल होता. त्यामुळे गणरायाचे रूप अधिक आकर्षक दिसत होते.
बाप्पांचे घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे स्वागत धूमधडाक्यात करण्यात येत आहे. शहरातील या चैतन्यमय वातावरणात सोशल मीडियावरही बाप्पांची स्वारी ऐटीत असल्याचे दिसून आले. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर होत होता. बाप्पांच्या विविध रुपांचे फोटो शेअर केले जात होते. गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत क्लिक केलेले सेल्फी पोस्ट केले गेले. बाप्पांच्या नैवेद्यासाठीच्या रेसिपी देखील व्हॉटसअॅपवर शेअर केल्या गेल्या. यासह शहरातील मानाच्या गणेशमूर्तींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले गेले.
गणेशमूर्ती खरेदीसाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता सर्वत्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतरत्र पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून रस्त्यावर मोठी वाहने लावण्यास मनाई करण्यात येत होती. गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात दंग असलेल्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख नियोजन केल्याचे दिसले.
गेवराई शहर व तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी असून दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून गणरायाने येताना पाऊस घेऊन यावा अशी आर्त हाक शेतकरी राजाने केली आहे.
हेही वाचा