Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सव 2023 चा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्वत्र गणेश उत्सव 2023 चा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री शाकंभरीची आरती ही गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
दैत्यें सुरजन गांजित पडला दुष्काळ
देखुनि दानव वधिसी सक्रोधें प्रबळ
शाखा वटुनि पाळिसी विश्वप्रिय सकळ
भक्ता संकटी पावसी जननी तात्काळ ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी
श्री बनशंकरी माये आदि विश्वंभरी ॥ धृ ॥
सद्भक्ती देवी तू सुर सर्वेश्वरी
साठी शाखा तुज प्रिय षड्विध सांभारी
तिळवे तंबिट कर्मठ द्वादश कोशिंबीरी
पापड सांडगे वाढिती हलवा परोपरी ॥ २ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी
श्री बनशंकरी माये आदि विश्वंभरी ॥ धृ ॥
अंबे कर्दळि द्राक्षे नाना फल जाण
दधि घृत पय शर्करा लोणची नववर्ण
कथिका चाकवत चुक्का मधुपूर्ण
वाढिती पंचामृत, आले लिंबू लवण ॥ ३ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी
श्री बनशंकरी माये आदि विश्वंभरी ॥ धृ ॥
बर्बुरे कडी वडे वडिया वरान्न
सुगंध केशरी अन्न विचित्र चित्रान्न
भक्ष्यभोज्य प्रियकर नाना पक्वान्न
सुरार रायति वाढिती षड्रस परमान्न ॥ ४ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी
श्री बनशंकरी माये आदि विश्वंभरी ॥ धृ ॥
पोळी सुगरे भरीत आणि वांगीभात
पात्रीं वाढिती सर्वही अपूप नवनीत
जीवन घेता भोजनी प्रसन्न भक्तातें
प्रार्थुनि तांबूल देऊनि वंदी गुरूभक्त ॥ ५ ॥
जय देवी जय देवी जय शाकंभरी
श्री बनशंकरी माये आदि विश्वंभरी ॥ धृ ॥