केज: पुढारी वृत्तसेवा: गोरगरिबांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने 'आनंदाचा शिधा' ही योजना जाहीर केली. परंतु आज दिवाळीचा पहिला दिवस संपत आला, तरी केज तालुक्यातील गरिबांच्या तोंडात दोन गोड घास गेले नाहीत. त्यांना दिवाळी भाजी भाकरीवरच भागवावी लागली.
केज तालुक्यात सुमारे ४५ हजार रेशन कार्ड धारक असून त्यांना दिवाळीच्या सणाला त्यांच्या घरात दिवाळी गोड व्हावी. कुटुंबातील सर्वांच्या तोंडात दोन गोड घास जावेत. या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय घेतला. परंतु, केज तालुक्यातील गोरगरीब लोकांना हा दिवाळीचा 'आनंदाचा शिधा' अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आता केज तालुक्यातील लोकांची दिवाळी आनंदात नव्हे, तर दुःखात गेली आहे. त्यांना घरातील चिल्यापिल्यांची दिवाळी ही घरातील मीठ भाकर आणि चटणी भाकरीवरच साजरी करावी लागली आहे. घरातील चिलीपिली आता त्या आनंदाच्या शिद्याची वाट पाहत आहेत.
लवकरच सर्वांना शिधा मिळणार
काही वस्तू कमी असल्यामुळे आनंदाचा शिधा आज वाटप करता आला नाही. आता अगदी थोड्या वेळात सर्व वस्तू उपलब्ध होत असून त्या माध्यमातून पुरवठा विभागाकडून केज तालुक्यातील सुमारे ४५ हजार लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
– सुहास हजारे, नायब तहसीलदार, (पुरवठा विभाग)
हेही वाचलंत का ?