बीड : साहेब,आम्हीही ऊसच तोडावा का? … चिमुकल्याचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र | पुढारी

बीड : साहेब,आम्हीही ऊसच तोडावा का? ... चिमुकल्याचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

धारूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जायभायवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वीसपेक्षा कमी पटसंख्या आहे. यामुळे ही शाळा बंद होणार असल्याची जोरदार चर्चा असून या अनुषंगाने शाळेतील एका चिमुकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहीले आहेत. यात त्याने साहेब, आई- वडिलांप्रमाणे आम्हीही उसच तोडावा का? असा थेट सवाल केला आहे.

धारूर तालुक्यात जायभायवाडी हे छोटेशे गाव बालाघाटाच्या डोंगर कुशीत वसलेले आहे. येथील बहुतांश लोक ऊसतोड मजूर आहेत. ते सहा महिने साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी जातात. शासनाने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या  शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जायभयवाडी शाळेचे मुख्यध्यापक यांनी तेथील
शाळा बंद होणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.

यानंतर एका चिमुकल्या विद्यार्थ्याने तोडक्या- मोडक्या शब्दात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहूनसाद घातली आहेत. त्याने पत्रात म्हटले आहे. “ साहेब, माझे गाव डोंगरात आहे. आई- वडील ऊस तोडायला जातात. शाळा बंद झाली तर मला त्यांच्यासोबत साखर कारखान्यावर जावे लागेल. मग मी देखील त्यांच्यासारखाच ऊसतोड मजूर बनेल. आई- वडिलांप्रमाणे आम्ही देखील उसच तोडायचा का? असा प्रश्न करत आमच्या गावापासून दुर शाळा आहे. तिथे जाण्यासाठी एक मोठा ओढा ओलांडावा लागतो. ओढ्यातून डोक्याएवढे पाणी वाहते. यामुळे शाळा बंद करू नका,” असे समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Back to top button