गेवराई, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राक्षसभूवन येथे गुरुवार रोजी सकाळी गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या जेसीबी व दोन हायवावर अधीक्षक आर राजा यांच्या पथकाने कारवाई कली आहे. यामध्ये तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही जप्त वाहने चकलांबा पोलिस ठाण्यात लावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या संदर्भात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
तालुक्यातील राक्षसभूवन येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिस अधीक्षक आर. राजा यांना मिळाल्यावर गुरुवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी गोदापात्रात अवैध उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. यात दोन हायवा व एक जेसीबी हे उत्खनन करत असल्याचे दिसताच धाड टाकुन दोन हायवा व एक जेसीबी पकडून तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई एसपी प्रमुख एपीआय गणेश धोक्रट, पोलीस नाईक अन्वर शेख, गोविंद काळे, सचिन पाटेकर तसेच चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि भास्कर नवले, गाडेकर यांनी केली. ही पकडलेली वाहने व जेसीबी चकलांबा पोलिस ठाण्यात लावण्यात आली असून या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
अनेक कारवाया अवैध वाळू वाहतूक प्रकरणी होत आहेत. तरीही अवैध वाळू वाहतूक काही थांबलेली नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अवैध वाळू उपसा बंद करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.