औरंगाबाद : शहरातील ४७१ कोटीच्या कामांना शासनाचा हिरवा कंदील

औरंगाबाद : शहरातील ४७१ कोटीच्या कामांना शासनाचा हिरवा कंदील

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १९३ कोटी रुपयांच्या कामांना राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता बहाल केली आहे. यासोबतच सातारा-देवळाई ड्रेनेज लाइनसाठी २७६ कोटी आणि ऐतिहासिक कमल तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी २.७८ अशा तब्बल ४७१.७८ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे या निविदा काढून काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रपुरस्कृत अमृत-२.० अभियानांतर्गत महापालिकेच्या २.७८ कोटी प्रकल्प किमतीच्या कमल तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पास, त्याच प्रमाणे २७५.८८ कोटी रुपयांच्या मलनि:सारण प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. कमल तलाव पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाचे कार्यान्वयन करणारी यंत्रणा औरंगाबाद महापालिका असणार असून, मलनि:सारण प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असणार आहे. या प्रकल्पांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा औरंगाबाद महापालिकेमार्फत भरण्यात यावा, असे शासनाने प्रशासकीय मान्यतेच्या आदेशात नमूद केले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयानुसार या प्रकल्पांची अंमलबजावणी करणे कार्यान्वयक यंत्रणेस बंधनकारक असणार आहे. प्रकल्पांची निविदा प्रक्रिया व अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे. प्रकल्पांच्या कामाचे कार्यादेश प्रशासकीय मंजुरीच्या आदेशापासून ४५ दिवसांच्या आत द्यावेत. कार्यान्वयक यंत्रणेने याबद्दलची दक्षता घ्यावी, असेही शासनाने म्हटले आहे. या तिन्हीही प्रकल्पांना राज्य शासनाने 9 फेब्रुवारी रोजी प्रशासकीय मान्यता दिली. त्याची अधिकृत प्रत पालिकेला नुकतीच प्राप्त झाली आहे.

मनपाचा हिस्सा स्वतंत्र खात्यात

केंद्र व राज्य शासनाने वितरित केलेल्या निधीच्या प्रमाणात औरंगाबाद महापालिकेने स्वतंत्र बँक खाते उघडून त्यात निधी ठेवणे अनिवार्य असेल, असेही शासनाने आदेशात नमूद केले आहे. यासाठी वितरित निधी प्रकल्पासाठी वापरणे बंधनकारक असून, इतरत्र वापरल्यास गंभीर वित्तीय अनियमितता समजण्यात येईल, असे नमूद केले आहे. आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे, तसेच जागा उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही कार्यादेश देण्यापूर्वी करावी, असेही सूचित केले आहे.

निधीतून कोणत्या कामांचे नियोजन? सातारा-देवळाईसाठी 276 कोटी

२०१६ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाईत अद्यापही मूलभूत सोयीसुविधांची वाणवा आहे. ड्रेनेजचीदेखील सुविधा नसल्याने २७६ कोटीच्या निधीतून मलनिस्सारण प्रकल्पाअंतर्गत सातारा-देवळाईत भूमिगत ड्रेनेजलाइन टाकण्याचे नियोजन आहे. पुढे कांचनवाडी एसटीपी प्लांटकडे ही लाइन वळवली जाणार आहे.

जुन्या पाणी योजनेचे बळकटीकरण १९३ कोटी

बहुप्रतीक्षित नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असतानाच जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासाठी१९३ कोटींची मान्यता मिळाली असून, यातून ७०० मि.मी.च्या जुन्या जलवाहिनीच्या जागी ९०० मि.मी.ची वाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

कमल तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प: २ कोटी ७८ लाख

आमखास येथील कमल तलावाची सद्य:स्थितीत पडझड झालेली आहे. या तलावाचे स्ट्रक्चर धुळीस मिळाले आहे. येथील अतिक्रमण काढण्यात आले असून, सलीम अली सरोवरच्या धर्तीवर कमल तलावाचे २ कोटी ७८ लाखांत पुनरुज्जीवन, सुशोभीकरण आणि संवर्धन केले जाणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news