Shiv Jayanti : हजारो शिवप्रेमी शिवजयंतीसाठी आज आग्र्याकडे रवाना होणार | पुढारी

Shiv Jayanti : हजारो शिवप्रेमी शिवजयंतीसाठी आज आग्र्याकडे रवाना होणार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दि. १९) आग्रा किल्ल्यातील दिवाण- ए- आममध्ये साजरी करण्यासाठी, तसेच ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवप्रेमी नागरिक औरंगाबादसह राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आग्रा किल्ल्याकडे आज (दि. १८)  रवाना होणार आहेत. (Shiv Jayanti )

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन आयोजित करत असलेल्या या शिवजयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती राहणार आहे.

Shiv Jayanti : किल्ला परिसरात तयारी जोरात

शिवजयंतीनिमित्त आग्रा येथील किल्ल्यामध्ये संध्याकाळी सहा वाजता शिवरायांचा जयजयकार होणार असून, जयंती साजरी करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिल्यानंतर शिवप्रेमींमध्ये उत्साह आहे. १९ फेब्रुवारीला आग्रा येथे जाण्याची लगबग सुरू झाली आहे. औरंगाबाद शहरातून शनिवारी दुपारी ११ वाजता रेल्वेस्टेशनवर येण्याचे नियोजन करण्यात आले असून, या ठिकाणाहून विशेष रेल्वेने हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना होणार आहेत, या गाडीमध्ये केवळ औरंगाबादच्याच नाही तर मराठवाड्यातील शिवप्रेमींचा समावेश राहणार आहे. याशिवाय विमान, तसेच खासगी वाहनांनी शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना होण्यास शुक्रवारपासूनच सुरुवात झाली आहे. आग्रा येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा वेध घेणारा भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, तसेच या वेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे.

१ कोटी तरुण डिजिटल स्वरूपात सहभागी होणार

आग्रा येथील शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरूपात दाखवण्यात येणार असून, सुमारे १ कोटी शिवभक्त त्यात सहभागी होणार आहेत, यासंदर्भात आयोजकांनी तयारी केली असून, सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एक स्वतंत्र लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विनोद पाटील यांनी घेतला तयारीचा आढावा

शिवजयंतीबाबत आग्रा येथील किल्ल्यात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी शुक्रवारी तयारीचा आढावा घेतला. दिवाण-ए-आम मध्ये ४०० शिवभक्तांना पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार प्रवेश मिळणार आहे, तर किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूस शिवप्रेमींना सोहळा पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीनचीही खास सोय करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाजता

Back to top button