उस्‍मानाबाद : मागण्या जरूर मांडा; पण जनतेला वेठीस धरून नको : अनिल परब | पुढारी

उस्‍मानाबाद : मागण्या जरूर मांडा; पण जनतेला वेठीस धरून नको : अनिल परब

उस्मानाबाद; पुढारी वृत्तसेवा

एसटी कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागण्या निश्‍चित ठामपणे मांडाव्यात; पण ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरुन नका. मागण्या मांडण्याचे अनेक पर्याय आहेत, असे सांगत परिवहनमंत्री अनिल परब यांनी आत्महत्या न कर्‍याचे आवाहन एसटी कर्मचार्‍यांना केले.

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी परब आज (शुक्रवार) तुळजापुरात आले होते. त्या वेळी त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असल्याने ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेचे मोठे हाल होत आहेत. या संपामुळे जनता वेठीला धरली गेली आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या मागण्या मांडण्याचा हक्‍क जरुर आहे. त्यांनी मागण्या ठामपणे मांडाव्यात; पण जनतेला वेठीला धरु नये. यासोबतच कर्मचार्‍यांनी आत्महत्येसारखा मार्गही चोखाळू नये, असे आवाहन त्‍यांनी कर्मचाऱ्यांना केले. ते म्हणाले, की आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे कुटुंब उघड्यावर पडते. त्यातून कुटुंबियांवर मोठा मानसिक आघात होतो. त्यामुळे असे मार्ग कर्मचार्‍यांनी अवलंबू नयेत.

एसटीचे कर्मचारी ऐकतच नसल्याने सरकार आता हातावर हात ठेवून बसू शकत नाही. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करावीच लागेल. ती सुरु आहे. या शिवाय बडतर्फ, निलंबीत कर्मचार्‍यांवरील कारवाई मागे घेण्याचाही आता काही विषय नाही.

सोमय्यांना टोला…

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री परबांवर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, ना. परब म्हणाले, की कोकणात मी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा त्यांचा आरोप आहे. वास्तविक यात राज्य तसेच केंद्र सरकारच्या यंत्रणांनी चौकशी केली आहे. यात मी कुठेच दोषी नसल्याचे सिध्द झाले आहे. असे असतानाही सोमय्या खोटेनाटे आरोप करीत सुटले आहेत. त्यामुळेच मी त्यांच्यावर 100 कोटी रुपये मानहानीचा दावा लावला आहे. त्यांनी आता एकतर माझी माफी मागावी अन्यथा शंभर कोटी रुपये भरपाई द्यावी.

Back to top button