पैज आली अंगलट! बाईकवर गर्लफ्रेंडसोबत लाँग किसिंग; पोलिसांनी बॉयफ्रेंडची 'तडप' काढली... - पुढारी

पैज आली अंगलट! बाईकवर गर्लफ्रेंडसोबत लाँग किसिंग; पोलिसांनी बॉयफ्रेंडची 'तडप' काढली...

औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा : सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आणि तारा सुतारियाचा ‘तडप’ सिनेमा आठवला का?, हो हो ‘तडप’… बॉक्स ऑफिसवर फारसी कमाल दाखवू न शकलेल्या या सिनेमातील एका दृष्याची ‘तडप’ मात्र असूनही तरुणाईमध्ये किती धूम घालीत आहे, याचा प्रत्यय औरंगाबादेत आला. थर्टी फर्स्टला मित्र एकत्र जमल्यावर सारखा प्रेयसीलाच बोलत असल्याने मित्रांनी, ‘काय सारखा फोनवर बोलतोस, तुझ्यासाठी ती काय करू शकते हे दाखव,’ अशी पैज टाकली. त्यानंतर त्यानेही काही मिनिटांत प्रेयसीला बोलावून घेत चक्क क्रांती चौक ते सेव्हन हिल आणि सेव्हन हिल ते क्रांती चौकदरम्यान दुचाकीवर प्रेयसीला बसवून ‘लाँग किस’ घेतला. हा व्हिडिओ ३ जानेवारीला प्रचंड व्हायरल झाला. त्यावरून जिन्सी पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले.

सूरज गौतम कांबळे (२४, रा. अलोकनगर, बीड बायपास, सातारा परिसर) असे प्रियकराचे नाव आहे. तो पूर्वी बायजीपुरा भागात राहायचा. सध्या तो एका कापड दुकानात कामाला आहे. एमए प्रथम वर्षात शिक्षण सुरू असलेल्या सूरजचे बीए प्रथम वर्षात शिकत असलेल्या नात्यातीलच तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यांचे फोनवर चॅटिंग व बोलणे सुरू असते. ३१ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते दहा वाजता सूरज मित्रांना भेटायला क्रांती चौक भागात आला. काही वेळानंतर तो सारखा फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाऊ लागला. मित्रांना भेटायला आल्यावरही मैत्रिणीलाच बोलत असल्याने मित्रांनी त्याची मजा घेण्याचे ठरविले. ‘आम्हाला सोडून तू जिच्याशी बोलतोस ती तुझ्यासाठी काय करू शकते?’, असा सवाल करून मित्रांनी सूरजला बुचकळ्यात पाडले. ती आपल्यासाठी काहीही करू शकते, असे त्याने उत्तर दिले. त्यावर ‘तडप’ सिनेमातील सीनप्रमाणे दुचाकीवरून दीर्घ चुंबन घेण्याची पैज लावली.

दहा मिनिटांत आली मैत्रीण…

सूरजने फोन केल्यावर रात्रीची वेळ असूनही अवघ्या दहा मिनिटांत त्याची प्रेयसी क्रांती चौकात हजर झाली. त्यानंतर सूरजने एका मित्राची दुचाकी घेतली. प्रेयसीला समोर बसवून सूरजने सुरुवातीपासून तडप सिनेमातील सीन प्रत्यक्षात सुरू केला. संपूर्ण जालना रोडने सेव्हन हिल उड्डाणपुलापर्यंत आणि तेथून वळण घेऊन पुन्हा क्रांती चौकापर्यंत त्यांचे हे अश्लील कृत्य सुरू होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यावरून पोलिसांनी सूरजविरुद्ध गुन्हा दाखल केला. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे, स्वत:सह दुसऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे वाहन चालविणे आदी प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

Back to top button