‘चुप बैठो, हम कोरोना टेस्ट कर रहे है’ म्हणत टाकला दरोडा | पुढारी

'चुप बैठो, हम कोरोना टेस्ट कर रहे है' म्हणत टाकला दरोडा

माजलगाव (जि. बीड); पुढारी वृत्तसेवा: माजलगाव शहराच्या हद्दीत असणार्‍या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला. यावेळी सहा चोरट्यांनी ‘चुप बैठो, हम कोरोना टेस्ट कर रहे है’, असे म्हणत घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेवून पसार झाले.

याबाबतीत सूत्रांनी दिलेली  माहिती अशी की, शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे व सावित्री लक्ष्‍मण शिंदे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला, सुना नातवंडासह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात. बुधवार (दि.१) रोजी रात्री ११ च्या सुमारास त्याचा मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आला. घराच्या मेनगेटला आतून कुलूप लावून वरच्या मजल्यावर तो झोपण्यासाठी गेला. दरम्यान, खालच्या हॉलमध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपले होते.

गुरूवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेटचे कुलूप तोडत असल्याचा आवाज शिंदे वृद्ध दांपत्याला झाला. दरम्यान ६ अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. शिंदे दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतातच शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण केली. याशिवाय अज्ञात चोरट्यांनी ‘चुप बैठो हम यहा कोरोना टेस्ट कर रहे है ‘, असे म्हणत घरातील कपाट उघडून सामानाची नासधूस केली.

यावेळी दरोडेखोरांनी कपाटातील सोन्याची साखळी ( ६० हजार रूपये), दोन सोन्याच्या अंगठ्या ( ६० हजार रूपये), गंठन (४० हजार रूपये), मनीमंगळसुत्र ( २२ हजार रूपये), ५.५ ग्रॅम वजनाचे काळ्या मनीमध्ये ओवलेले ५२ हजार रुपयांचे एक जोड, सोन्याचे वेल व झुंबर, लहान मुलाच्या कानातील कुडक, चांदीचे चैन व वाळे यासह रोख ८ हजार रोख रक्कमेसह एकूण २ लाख, ४७ हजार रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केला. याच दरम्यान चोरट्यांनी जाताना घराला बाहेरून बंद केले होते.

दरम्यान या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात चोरट्याविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संजीवनी लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.  तपास पो. नि. धनंजय फराटे करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button