हिंगोली क्राईम : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख रुपये लांबविले - पुढारी

हिंगोली क्राईम : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख रुपये लांबविले

वसमत (हिंगोली); पुढारी वृत्तसेवा : हिंगोली क्राईम : वसमत शहरात भरदिवसा घरफोटी व नजर ठेवून पैसे लाबंविण्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत. याच दरम्यान बुधवारी दुपारच्या सुमारास शहर पोलिस स्टेशन परिसरात महावीर चौकाजवळ भरदिवसा धावत्या दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख रुपये चोरट्यांनी लांबविण्याची घटना घडली आहे. वसमत शहर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ( हिंगोली क्राईम ) वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी माणिकराव बाबाराव नवघरे यांनी काही दिवसांपुर्वीच सोयाबीनची विक्री केली होती. त्याची रक्कम दुकानदारांनी त्यांच्या खात्यावर आसेगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेत आरटीजीएसद्वारे जमा केली होती. त्यानंतर आज बुधवारी (दि.१) रोजी दुपारी ते बँकेत एक लाख रुपये काढण्यासाठी दुचाकी वाहनावर आले होते.

यानंतर ते बँकेतून एक लाख पैसे रुपये घेवून परत गावाकडे निघाले. मात्र, वसमत शहर पोलीस स्टेशन समोरील महावीर चौकामध्ये गर्दी असल्यामुळे नवघरे यांनी त्यांच्या दुचाकीचा वेग कमी केला. या संधीचा गैरफायदा घेत एका चोरट्याने दुचाकीचा पाठलाग करून धावत्या दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख रुपये काढून पळ काढला.

यानंतर तेथून काही अंतरावर एका दुकानासमोर आल्यावर डिक्कीतील पैसे पळविल्या गेल्याचे माणिकराव नवघरे याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वसमत शहर पोलिस ठाण्यात याची माहिती दिली.

पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास खार्डे यांच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली. यामध्ये एक चोरटा दुचाकीच्या मागे पळून डिक्कीतील पैसे काढत असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button