छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा तडाखा वाढल्याने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत शाळांचे वर्ग फक्त सकाळच्या वेळेत भरविले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र अजूनही पूर्ण वेळ आणि भर दुपारी शाळा भरविण्यात येत आहे. सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल झालेला नाही, त्यामुळे शाळेच्या वेळेत कोणाताही बदल करु नये, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी काढले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ४२०० शाळा आहेत. त्यात जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या २१३० इतकी आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शाळांमध्ये एकूण नऊ लाख १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. दरवर्षी उन्हाचा तडाखा वाढला की शाळांच्या वेळेत बदल करुन त्या सकाळच्या वेळेत अर्धवेळ भरविल्या जातात. यंदाही शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काही दिवसांपूर्वी विभागातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर जालना जिल्ह्यासह इतर काही जिल्हा परिषदांनी शाळा सकाळच्या वेळेत अर्धवेळ भरविण्यास सुरूवात केली.
मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजूनही भर दुपारी पूर्णवेळ शाळा भरविलेल्या जात आहेत. त्यामुळे तापलेल्या पत्र्याच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांनी १८ मार्च रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळेच्या वेळेत कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल झालेला नाही, त्यामुळे शाळा अर्धवेळ न करता पुढील आदेशापर्यंत पू्र्णवेळच ठेवण्यात याव्यात, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधील सुमारे ३३३५ वर्गखोल्यांचे छत पत्र्याचे आहे. उन्हाळ्यात हे पत्रे तापतात. शिवाय ग्रामीण भागात वीज पुरवठाही नेहमी उपलब्ध नसतो. त्यामुळे पंखा बंद असल्याने विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास सोसावा लागत आहे. या ३३३५ वर्गखोल्यांचे छत पक्के बनविण्यासाठी जिल्हा परिषदेने गतवर्षी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण ३६७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र, त्यास कोणताही निधी मिळाला नाही.
तापमान वाढल्याने उन्हाचा त्रास वाढला आहे. अशा परिस्थितीत भर दुपारी आणि पूर्णवेळ शाळा भरविणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना दुपारच्या वेळेत, पंखे बंद असताना आणि पत्र्याच्या खोल्यांमध्ये शिकविणे आणि शिकणे मुश्किल होत आहे. म्हणून शेजारच्या जिल्ह्यांप्रमाणे इथेही शाळांच्या वेळेत बदल करुन सकाळच्या वेळेतच शाळा भरविण्यात याव्यात.
– प्रदीप विखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघ
हेही वाचा