

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील बिडकीन, पाचोड, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून दुचाकीसह लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. पैठण येथील नाथषष्ठी यात्रा सुरू होण्यापूर्वीच चोरट्यांनी डोके वर काढल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
पैठण तालुक्यातील बिडकीन, पाचोड, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातून अविनाश वेडे यांची हिरो होंडा शाईन मोटर सायकल चोरून नेली. तर बिडकीन हद्दीतील चितेगाव सह्याद्री पार्क परिसरातील एका घरात चोरी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. बिडकीन शहरामध्ये चोरीची घटना घडली असून या ठिकाणी एक चोरट्याला नागरिकांनी पकडून बांधून ठेवले.
पाचोड पोलीस हद्दीमधील पारूंडी येथे मेहताब शेख यांच्या घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून नगदी रक्कम व मौल्यवान दागिने चोरट्यांनी लंपास केले. चोरीची घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी बिडकीन पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पाचोड सपोनि शरदचंद्र रोडगे, एमआयडीसी ईश्वर जगदाळे यांना तत्काळ अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा