

शिवना, पुढारी वृत्तसेवा: सिल्ल्लोड तालुक्यातील शिवना येथील संत धोंडिबा महाराज मंदिराजवळील हाजी सलीम यांचे महाराष्ट्र आटो पार्टस व वाहन दुरुस्तीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पंधरा लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना ताजी असताना शनिवारी (दि.९) रात्री दोन ते तीनच्या सुमारास हिम्मत नगर, शिक्षक कॉलनी व संत धोंडिबा महाराज मंदिर परिसरातील ४ घरे व १ दुकान फोडले. यात अंदाजे दीड ते दोन लाखांचे साहित्य व दीड ते दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
एकाच दुकानातून पंधरा दिवसांच्या काळात दुसऱ्यांदा चोरी झाली. यासह हिम्मत नगर येथील वाळूबा पाटील राऊत यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी, बँकेचे कर्मचारी तडवी यांचे बंद घराचे कुलूप तोडले, त्यानंतर शिक्षक कॉलनी भागात भाड्याच्या घरात राहणारे मंगेश गजानन सोनवणे (रा. दहिगाव ता. भोकरदन) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील दीड ते दोन लाखांची रोख रक्कम लंपास केली. त्याच भागातील हर्षल स्वामी यांच्या घराचे कुलूप तोडले. अक्षय मनोहर जगताप यांची होंडा डीलक्स दुचाकी चोरली. चोरट्यांनी संत धोंडिबा महाराज मंदिर परिसरातील भारत जगन्नाथ काळे यांची पल्सर बजाज कंपनीची दुचाकी चोरली. यापैकी दोन दुचाकी शिवण्यात तर एक अजिंठा येथे सोडून चोरटे पसार झाले आहेत.
अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, फौजदार धम्मदीप काकडे, बिट जमादार अरुण गाडेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तर श्वान पथकातील ए. एस. आय नासिर पठाण, श्वान ज्युलिया, अंगुली मुद्रा पथकाचे सपोनी एम. एन. पठाण हे सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी हजर होते. तर सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. शिक्षक कॉलनी भागात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांच्याकडे शस्त्रे व इतर साहित्य असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा