

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी संबंधित कार्यालय चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शनिवारी दिवसभर कुलूप बंद असल्यामुळे आदेशाची पायमल्ली झाली.
जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असलेल्या लेखा आक्षेपाचे फेब्रुवारीअखेर पर्यंत १०० टक्के अनुपालन सादर करून किमान ५० टक्के आक्षेप निकाली काढण्याचे विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेला सूचना केलेली आहे. ९५९८ आक्षेपांपैकी केवळ ८९८ आक्षेपांचे अनुपालन सादर झालेले असल्याने पुढील उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या सर्व विभागांना शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालय चालू ठेऊन प्रलंबित अक्षेपांच्या अनुपालनास्तव आवश्यक माहिती पुरविण्यासाठी लेखा विभागाने आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. परंतु, संलग्नित असलेले एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय दि.१० फेब्रुवारीरोजी शनिवारी दिवसभर कुलूप बंद होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लेखाविभागाने दिलेल्या आदेशासास सदर कार्यालयाने केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून आले. पंचायत समिती कार्यालयात मात्र, कामकाज चालू असल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा