Hingoli Lok Sabha : शरद पवारांच्या भूमिकेने लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता | पुढारी

Hingoli Lok Sabha : शरद पवारांच्या भूमिकेने लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

गजानन लोंढे

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अ‍ॅड. सचिन नाईक यांनी गुरूवारी इंडिया आघाडीचे घटक असलेले खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनगर समाजाला प्रतिनिधीत्व देण्याची मागणी केली. खा. पवार यांनी आपल्या पक्षाचा दावा मागे घेत काँग्रेसने हिंगोली लोकसभेसाठी धनगर समाजाचा उमेदवार द्यावा, तोही संघटनेत काम करणारा असावा. तर दुसरीकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे मनही यासाठी वळवू, असा शब्द दिल्याने काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एकंदरीत खा. पवार यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. Hingoli Lok Sabha

धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने खा. शरद पवार यांची भेट घेऊन हिंगोली, माढा, यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी केली. यावर खा. पवार यांनी काँग्रेस पक्ष धनगर समाजाला हिंगोलीची जागा देत असेल, तर आमचा पक्ष निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरणार नाही. शिवसेनेच्या नेतृत्वालाही समजून सांगू. परंतू, तो उमेदवार संघटनेत काम करणारा असावा, असे स्पष्ट करीत अशोक चव्हाणही हिंगोली लोकसभेसाठी आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, खासदार पवार यांनी माजी मंत्री दांडेगावकर यांचा विशेष उल्‍लेख करीत त्यांना विधानसभेनंतर राज्यसभेवर घेऊ, असे सांगितले. यातून पवारांचा दांडेगावकरांवर असलेला विश्‍वास अधोरेखित झाला. तर दुसरीकडे धनगर समाजाला काँग्रेस उमेदवारी देत असेल, तर आम्ही दोन पावले मागे येऊ, अशी भुमिका घेतल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मात्र कोंडी झाली आहे. Hingoli Lok Sabha

चव्हाण यांनी हिंगोलीसाठी डॉ. अंकुश देवसरकर यांच्यासाठी पक्षाकडे आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. आता खुद्द पवारांनीच धनगर समाजाला हिंगोलीतून प्रतिनिधीत्व द्यावे, अशी भूमिका घेतल्याने देवसरकरही बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातवांनाही अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आ. सातव यांनी गुरूवारी थेट दिल्‍ली गाठत सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपणही लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याने काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

Hingoli Lok Sabha : भाजपची सावध भूमिका

तर दुसरीकडे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने सावध भूमिका घेतली आहे. शिंदे गटाकडून खासदार हेमंत पाटील यांनी तयारी सुरू केली असताना दुसरीकडे काँग्रेसने ओबीसी उमेदवार दिल्यास भाजपकडूनही ओबीसी उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु अद्यापही भाजपने आपले पत्ते ओपन केले नाहीत.

हिंगोली लोकसभेत होणार सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग

हिंगोली लोकसभेतून धनगर समाजास उमेदवारी दिल्यास इतर लोकसभा मतदार संघातही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल, असे स्पष्ट मत खासदार शरद पवारांनी व्यक्‍त केले आहे. हा मतदारसंघ ओबीसी बहूल असल्याने येथून काँग्रेसने ओबीसी उमेदवारास संधी द्यावी, असा सूर उमटत असतानाच अ‍ॅड. सचिन नाईक यांच्या उमेदवारीला शरद पवारांनीच अप्रत्यक्षपणे संमती दिल्याने महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटेल, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. ओबीसी उमेदवार देण्याबरोबरच वंचितला सोबत घेतल्यास मताची विभागणी होणार नाही, अशी काळजीही काँग्रेस श्रेष्ठींकडून घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.

आ. प्रज्ञा सातव सोनिया गांधीना भेटल्या

काँग्रेसमधील इच्छुकांकडून आपआपल्या पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली असताना गुरूवारी आमदार प्रज्ञा सातव यांनी थेट दिल्‍ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली. ही भेट महत्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. आता त्यांनी थेट सोनिया गांधी यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे.

हेही वाचा 

Back to top button