

कळमनुरी: पुढारी वृत्तसेवा : कयाधू नदीवर स्वयंचलित दरवाज्यांच्या उच्च पातळी प्रमाणेच लहान बंधारे बांधावेत, तसेच शेनोडी-रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता देण्याच्या मागणीसाठी पाणीहक्क संघर्ष समितीच्यावतीने आज (दि.७) हिंगोली ते कळमनुरी मार्गावरील मसोड फाटा येथे ३ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो गावकरी उपस्थित होते. Hingoli News
यावेळी माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, बाजार समिती सभापती मारोती खांडेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, साहेबराव जाधव, शंकरराव सुर्यवंशी, अॅड. रवि शिंदे, सुरेश सुर्यवंशी, शामराव कांबळे, विनोद बांगर, मयुर शिंदे, उत्तमराव कुरवाडे, राकेश भट्ट यांच्यासह परिसरातील सुमारे ५०० पेक्षा अधिक गावकरी उपस्थित होते. Hingoli News
जिल्ह्याचा सिंचन अनुशेष अद्यापही शिल्लक आहे. मात्र त्यानंतरही कयाधू नदीचे पाणी नांदेडकडे वळवून नदीचे वाळवंट करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सापळी धरणाला पर्याय म्हणून खरबी बंधार्याला मान्यता दिली आहे. मात्र, त्यावेळी कयाधू नदीवर उच्च पातळी बंधारे बांधण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, असा कोणताही प्रस्ताव तयार करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी शेनोडी-रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करावा. या योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. कयाधू नदीवर उच्चपातळी बंधार्या प्रमाणेच लहान बंधार्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी १५ फेब्रुवारीरोजी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक बोलावण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होती. यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार लक्ष्मीकांत माखणे, गजानन होळकर यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
या आंदोलनाच्या वेळी एका गंभीर आजारी रुग्णास घेऊन रुग्णवाहिका हिंगोलीकडे येत होती. मात्र रस्ता रोको असल्यामुळे रुग्णावर उपचारासाठी प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आंदोलकांनी तातडीने रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.
हेही वाचा