Balkumar Sahitya Sammelan: मानवत येथे विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन | पुढारी

Balkumar Sahitya Sammelan: मानवत येथे विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

डॉ. सचिन चिद्रवार

मानवत: साहित्य हे समाज मनाचा आरसा असून त्यामध्ये वाचकाला समाजाचे प्रतिबिंब दिसते. समाजाला बदलण्याची ताकद साहित्यामध्ये असून सध्या मोबाईल संस्कृतीमूळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे त्यासाठी मुलांच्या एका हातात मोबाईल देणार असाल तर दुसऱ्या हातात पुस्तकही द्या, असे केले तरच वाचन संस्कृती टिकेल, असे प्रतिपादन नाशिक येथील प्रख्यात ग्रामीण साहित्यिक, कवी, संपादक, प्रकाशक विजयकुमार मिठे यांनी केले. Balkumar Sahitya Sammelan

येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था मानवत व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.६) आयोजित केलेल्या ६ व्या विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदावरून ते बोलत होते. Balkumar Sahitya Sammelan

या संमेलनाचे उद्घाटन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले. यावेळी धर्मवीर चित्रपटातील अभिनेते व टीव्ही कलाकार मुंबई चे योगेश कुलकर्णी, प्रसिद्ध कवी व गीतकार बाबासाहेब सौदागर, जिल्हा शिक्षणाधिकारी संजय ससाणे, कवी इंद्रजित भालेराव, विठ्ठल तात्या संधान, प्रा. महेश मोरे, डॉ. उमेश देशमुख, डी. आर. रणमाळे, स्वागताध्यक्ष प्रा. अनंत गोलाईत, नंदकुमार सिसोदिया, रंगनाथ सोलंके आदी उपस्थित होते.

मिठे म्हणाले की, अशा साहित्य संमेलनातून विचारांची आदान प्रदान होत असते, उत्तम लेखक, कवी व वाचक घडतात. वर्षभरात आपण किमान एकतरी पुस्तक खरेदी करून वाचावे.

कार्यक्रमाच्या उद्घाटक आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, साहित्य संस्कृती टिकली पाहिजे, नवीन साहित्यिक घडले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहत मैदानी खेळ खेळावे. क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी ५ व्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे विजयकुमार मिठे यांच्याकडे सुपूर्द केली. किशोर तुपसागर, आनंद नांदगावकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गोलाईत यांनी आभार मानले.

संमेलन यशस्वीतेसाठी विलास मिटकरी, सोनय्या कीर्तनकार, डॉ संजय मुंदडा, प्रकाश करपे, गंगाधर कंकाळ, संजय पक्वान्ने, संदीप हंचाटे, गोविंद भुते, तरुण बांगड, राजेश मंत्री, शिवाजी बोचरे, दादा भोरकडे, गणेश भरड, सुनीता झाडगावकार, मीनाक्षी कंकाळ, सत्यभामा पुरी, अनिता गोलाईत, माया जानराव आदींनी प्रयत्न केले .

Balkumar Sahitya Sammelan : ग्रंथ दिंडी ठरली आकर्षण

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता येथील नगरपालिकेपासून मुख्य मार्गाने संमेलन स्थळापर्यंत भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली . येथील स्वामी समर्थ संस्कार केंद्राच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या ग्रंथ दिंडीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीत तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बालगोपालांनी महापुरुषांचा साकारलेला सजीव देखावा आकर्षक ठरला. रामायणाचा सजीव देखावा व म्युझिकल लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले .

संमेलनस्थळी विविध दालने

संमेलनस्थळी हदगाव येथील विनोद गोंगे व डासाळा येथील सोमेश्वर गजमल यांचे व्यंगचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पुस्तक स्टॉलवर देखील पुस्तके खरेदीसाठी विद्यार्थी व पालक जात होते. दालन व्यवस्था दशरथ रोकडे यांनी यांनी पाहिली. संमेलनस्थळी आकर्षक रांगोळीची सजावट आनंद नांदगावकर, जडे पेंटर व श्याम पेंटर यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button