परभणी: समृध्दी कारखान्याकडून ऊस नेण्यास टाळाटाळ; रेणाखळीच्या शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा | पुढारी

परभणी: समृध्दी कारखान्याकडून ऊस नेण्यास टाळाटाळ; रेणाखळीच्या शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

रेणाखळी, पुढारी वृत्तसेवा: देवी दहेगाव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील समृद्धी शुगर कारखाना पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथील भागधारक शेतकऱ्यांचा ऊस नेत नाही. १५ महिने होऊन सुध्दा ऊस गाळपास नेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कारखाना परिसरात शुक्रवारपासून (दि.९) आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना रेणाखळी येथील शेतकरी भगवान सहादु सागे यांनी दिले आहे.

समृद्धी शुगर कारखान्याचे पाथरी तालुक्यातील हादगाव नखाते सर्कलमधील बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांनी २१ हजार, ३१ हजार व ५१ हजार अशाप्रकारचे शेअर्स खरेदी केलेले आहेत. त्या आधारे शेतकऱ्यांनी ऊस लागवड केलेली आहे. परंतु यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने पाण्याअभावी ऊस वाळल्याने उत्पादनात घट होत आहे.

रेणाखळी गावात १०० च्या आसपास शेअर्स होल्डर असल्याने त्या आधारावर रेणाखळी गावात अंदाजे ५ हजार एकरावर ऊस लागवड केली आहे. ऊस गाळपास अपुरी यंत्रणा असल्याने समृध्दी शुगरकडून टाळाटाळ होत आहे. कारखान्याचे शेअर्स मध्ये पैसे अडकले असून त्याचा काही फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांत फसवणुकीची भावना तयार होत आहे. त्यामुळे पुढील ७ दिवसांत ऊस गाळपास न नेल्यास शुक्रवारपासून (दि.९) आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रेणाखळी येथील अंदाजे ५ हजार एकर ऊस लागवड एकाच महिन्यात झाली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम दि.१५ ते १७ नोव्हेंबरपासून चालू असुन योग्य वेळी ऊस गाळपास नेण्यात येईल.
– अमोल तौर, शेतकी अधिकारी, समृद्धी शुगर कारखाना

हेही वाचा 

Back to top button