सेलू, पुढारी वृत्तसेवा : श्रीराम जन्मभूमी अयोध्येत सोमवारी (दि.22) होणार्या प्राणप्रतिष्ठाच्या मुख्य समारंभासाठी जिल्ह्यातील ढालेगाव येथील श्री समर्थ वेद विद्यालयातील वेदमूर्ती शशांक कुलकर्णी यांना सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. ते शनिवारी (दि.13) अयोध्येकडे रवाना झाल्याची माहिती वेद विद्यालयाचे अध्यक्ष डी.बी.लड्डा, सचिव जयप्रकाश बिहाणी यांनी दिली.
देशातील 121 पौरोहित प्राणप्रतिष्ठा विधीचे पौरोहित्य करणार असून यात राज्यातील 26 पौरोहितांचा समावेश आहे. श्रीक्षेत्र काशी येथे कांचीपीठ शंकराचार्यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी आणि चंपतराय यांच्यावतीने काशीतील लक्ष्मीकांत शास्त्री दीक्षित यांच्यासह प्राणप्रतिष्ठा विधीचे प्रधानाचार्य म्हणून पंडित गणेश्वर शास्त्री द्राविड यांच्या मार्गदर्शनात विधिवत सोहळा होणार आहे. यात ढालेगाव येथील वेदमूर्ती शशांक कुलकर्णी व चर्तुवेदेश्वरधाम सावरगाव (जि.जालना) येथील देशीक कस्तुरे शास्त्री सहभागी होणार आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकासाचे कोषाध्यक्ष प.पू.गोविंददेव गिरी महाराज तथा संस्थापक अध्यक्ष असलेल्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे द्वारा संचलित ढालेगावातील श्री समर्थ वेद विद्यालयाची स्थापना 1993 ला झाली. चारही वेदांचे शिक्षण देणारे हे एकमेव वेद विद्यालय आहे. चार वेदांसह येथे संस्कृत व संगणकाचे शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे येथे संपूर्ण शिक्षण निशुल्क आहे. सध्या वेद विद्यालयात 72 विद्यार्थ्यांना 6 गुरुजन अविरत शिक्षण देण्याचे काम करतात. शशांक कुलकर्णी यांनी याच वेद विद्यालयात शिक्षण घेऊन 7 वर्षापासून शुक्ल यजुर्वेद मध्यांजन शाखेचे घनपाठी म्हणून येथे ज्ञानांर्जनाचे अविरत काम करत आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून त्यांना मिळालेल्या निमंत्रणपत्रात काशीचे प्रसिद्ध पंडित गणेश्वर शास्त्री द्राविड आणि संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीचे प्रमुख लक्ष्मीकांत दीक्षित या दोन महान व्यक्तींनी वेदमूर्ती शशांक कुलकर्णी यांचे नाव सोहळा समारंभात सहभागी होण्यासाठी सुचविले आहे. त्यामुळे सदर पूजेसाठी सहभागी होण्याची विनंती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे महामंत्री चंपतराय यांनी पत्राद्वारे केली.
महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान पुणे संचलित प्रतिष्ठाणचे कार्य देशातील 14 राज्यात सुरू आहे. महाराष्ट्रात 7 तर राज्याबाहेर 30 वेद विद्यालय असे एकूण 37 वेद विद्यालय कार्यरत आहेत. ढालेगाव येथील समर्थ वेद विद्यालयातून आजपर्यंत 325 विद्यार्थी पारंगत होऊन बाहेर पडले.
हेही वाचा