Rohit Pawar : बीडच्या जाळपोळीमागे गृहमंत्री, पालकमंत्री: रोहित पवार यांचा घणाघात | पुढारी

Rohit Pawar : बीडच्या जाळपोळीमागे गृहमंत्री, पालकमंत्री: रोहित पवार यांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील जाळपोळ ही प्रोफेशनल लोकांनी केली आहे. त्यांना सोडून बाजुला उभ्या असणाऱ्या तरुणांना पोलिस पकडत असल्याने या हल्ल्यामागे पोलिस प्रशासनासोबतच स्थानिक मंत्री आणि गृहमंत्री असल्याची माझी शंका आहे, असे स्पष्ट करीत आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. (Rohit Pawar)

रोहित पवार बुधवारी एका बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरात आले होते. येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

ते म्हणाले, बीड जिल्ह्यात जाऊन मी जाळपोळीच्या सर्व ठिकाणांची पाहणी केली आहे. मी आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पंडितांच्याही घरी गेलो होतो. मी तेथे सामान्यांशी चर्चा केली. तिथे असे समजले, जे कोणी आंदोलक होते, ते प्रोफेशनल लोक होते. त्यांच्याकडे फॉस्फरस व पेट्रोल बॉम्ब होते. त्यांनी प्रत्येक घराला विशिष्ट नंबर दिला होता. ७०, २२, २५, असे आकडे ते बोलत होते. त्यांच्याकडील बॅगमध्ये विशिष्ट साईजचे दगड होते. त्यांच्या गाडीमध्येही अनेक दगड ठेवले होते. बॅगमधील दगड संपले की ते गाडीकडे जाऊन पुन्हा दगड आणायचे. तेथील लोक घरात लहान मुले, महिला, वृद्ध असल्याचे सांगत असतानाही ते ऐकत नव्हते. त्यांनी ड्रग्जसारखी नशा केलेली असावी. कारण ते कितीही किलोमीटर पळत होते. उंच-उंच भिंती सहज चढत होते. त्यांच्या केसांची रचना एकसारखी होती. (Rohit Pawar)

तसेच त्यांच्याकडे १२ ते १३ रुग्णवाहिका होत्या. नागरिकांकडून हल्ला झाल्यावर त्यातील काहीजण जखमी झाले. त्यांना त्याच रुग्णवाहिकेतून बीडमध्ये न नेता थेट छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणले. मात्र, त्या रुग्णवाहिका छत्रपती संभाजीनगरातही आल्या नाहीत. त्यामुळे हे हल्ले, जाळपोळ मुद्दामहून केली होती का?, मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्लॅन होता का?, पोलिसांकडून कारवाई होत नसल्यामुळे शासनाकडूनच या गोष्टी केल्या जात आहेत का?, हल्लेखोर काही ठरावीक संघटनेचे असल्यासारखे दिसतात. माझा रोष थेट पोलिस प्रशासनावर आहे. त्यांनी हल्लेखोरांना लगेचच का पकडले नाही. त्यामुळे पुढे जाऊन ही शंका गृहमंत्री, स्थानिक मंत्री यांच्याकडे जाते. त्यानंतर काही नेते तेथे जाऊन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतात. हा महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न आहे का?, असा सवाल रोहित पवार यांनी केला.

Rohit Pawar : पोलिसांची बघ्याची भूमिका

रोहित पवार म्हणाले, आ. संदीप क्षीरसागरांच्या घरासमोरच बीड पोलिसांचे मुख्यालय आहे. तेथे २०० पोलिस हजर होते. त्यापैकी एकानेही या हल्लेखोरांना रोखले नाही. पोलिसांकडे ताकद असूनही त्यांनी काहीच कसे केले नाही?, त्यानंतरही पाच ते सहा तास पोलिसांकडून कारवाई झाली नाही. सुरुवातीला हिंदू-मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला गेला. ते शक्य झाले नाही म्हणून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ही जाळपोळ केली का?

घटनादुरूस्ती करून मराठ्यांना आरक्षण द्या

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आरक्षण देण्यासाठी ज्या पद्धतीने घटना दुरुस्ती केली. त्याच पद्धतीने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला न्यायालयात टिकेल, असे १३ ते १६ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. यावेळी ते कुठेही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले नाहीत.

हेही वाचा

Back to top button