जालना, पुढारी वृत्तसेवा: जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मनोज जरांगे -पाटील यांची भेट घेवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकार पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींची माहिती दिली. जरांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले की, जालना जिल्हा आणि मराठवाड्यापुरते आरक्षण मी स्वीकारणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. Manoj Jarange-Patil
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मनोज जरांगे यांनी गुन्हे का मागे घेतले नाही याबाबत जाब विचारला. दोन महिने झाले गुन्हे मागे का घेतले नाहीत. तुम्ही समाजाचे नुकसान का करत आहात. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला स्पष्ट सांगितले होते. दोन दिवसांत गुन्हे मागे घ्या. तरी तुम्ही मुद्दामपणे कुणीतरी गुन्हे मागे घेवू देत नाही. असे आम्हाला वाटते. ९० दिवस चर्जशीट दाखल करायला कशाला लागतात. ३० दिवसांत चार्जशिट दाखल करता येते. आज चार्जशीट दाखल करून उद्याच्या उद्या गुन्हे मागे घेता येतात मग का घेत नाहीत. Manoj Jarange-Patil
सरकारने पुराव्यांवर आरक्षण द्यावे. अर्धवट आरक्षण देऊ नये. दोन चार दिवस लागत असेल तर लागू द्या. पण सरसकट आरक्षणाचा जीआर काढा. अर्धवट जीआर काढला तर मी फाडून टाकील. मग तुमची फजिती होईल. मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी तपासा म्हणालो ,पुरावे घ्या म्हणलो. आता तुम्ही फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देतो म्हणतात, ते मान्य नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याशिवाय माघार नाही, असे सरकारला कळवा, असे जरांगेंनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना यावेळी सांगितले.
हेही वाचा