Parbhani Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी सेलू, आडगाव दराडे, धानोरा काळे येथे आमरण उपोषण | पुढारी

Parbhani Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी सेलू, आडगाव दराडे, धानोरा काळे येथे आमरण उपोषण

सेलू, जिंतूर, ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देवून तत्काळ आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी उपोषण सुरू करण्यात आले आहे. (Parbhani Maratha Andolan)

सेलू शहरात साखळी उपोषण सुरू

सेलू शहरातील लोकमान्य टिळक पूतळा परिसरात मागील चार दिवसांपासून चार तरूणांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. जयसिंग शेळके, प्रसाद महाराज काष्टे, भाऊसाहेब झोल, एकनाथ बोरूळ यांच्यासोबत सतीश आकात, वैभव कदम, कृष्णा वाघ, सागर वावरे, बाळासाहेब कदम, संभाजी कदम, अविनाश गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला आहे. (Parbhani Maratha Andolan)

Parbhani Maratha Andolan : आडगाव दराडे येथे साखळी उपोषण

आडगाव दराडे (ता. सेलू) येथे शुक्रवारीपासून (दि.२७) साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. गावातील सर्व समाज बांधवांच्या वतीने मारुती मंदिर परिसरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. शासनाने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण नाही दिले, तर महाराष्ट्रभरात आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

धानोरा काळे येथे सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण

ताडकळस येथून जवळच असलेल्या धानोरा काळे (ता. पूर्णा) येथे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना धानोरा काळे येथे गाव बंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे – पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून गुरूवार (दि.२६) पासून बस स्टॅडवर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. परिसरातील मुबर, गोळेगाव, बाणेगाव, माहेर, कळगाव येथील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button