हिंगोली: लाख येथे वाहनात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

हिंगोली: लाख येथे वाहनात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे एका वाहनामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत बासंबा पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र त्या ठिकाणी चौकशी केली असता सदर माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या प्रकरणात पोलिसांनी खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीवर शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता एका व्यक्तीने डायल ११२ या क्रमांकावर संपर्क करून लाख येथे एका वाहनामध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. शेकुराव नागोजी सोळंके (रा. लाख ) असे या व्यक्तीने त्याचे नाव सांगितले. या माहितीवरून बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार सचिन गोरले यांच्या पथकाने अवघ्या १० मिनिटांतच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्या ठिकाणी शुकशुकाट होता.

त्यानंतर पोलिसांनी शेकुराव सोळंके याच्या शोध घेतला असता तो घरी आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे बॉम्ब कुठे पाहिला याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. सदर माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. मात्र, पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून जमादार गोरले यांनी तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शेकुराव सोळंके याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news