हिंगोली : जांभरून रोडगेत कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक | पुढारी

हिंगोली : जांभरून रोडगेत कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील जांभरुण रोडगे येथे घराचे कुलूप तोडून दागिने पळविणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१७) गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासात अटक केली आहे. त्याच्याकडून दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गणेश शंकर रोडगे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील फुलाजी रोडगे हे सोमवारी घराला कुलूप लावून कुटुंबियांसह शेतात कामासाठी गेले होते. घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ७५ हजार रुपयांचा ऐवज पळविला.

फुलाजी रोडगे हे सायंकाळच्या वेळी शेतातून घरी परतल्यानंतर त्यांना कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. तसेच दागिने व रोख रक्कम देखील पळविण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकाराची माहिती तातडीने नरसी नामदेव पोलिसांना दिली. नरसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, विठ्ठल काळे, महादू शिंदे, हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला. तपासात गावातीलच गणेश रोडगे याने चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

Back to top button