भगवान बाबांची भक्ती अन् समर्थकांची शक्ती; पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता | पुढारी

भगवान बाबांची भक्ती अन् समर्थकांची शक्ती; पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता

बीड : बालाजी तोंडे

‘स्वाभिमानी बाणा, अन् ताठ कणा’, या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे विचार अन् पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्या अस्मितेतून उभा राहीलेल्या भगवान भक्ती गडावर मंगळवारी (दि.२४) पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा  ( Dasara Melava ) होत आहे. विसाव्या शतकातील थोर संत असलेल्या भगवान बाबा यांची भक्ती अन् अठरा पगड जाती- धर्मातील मुंडे प्रेमींची शक्ती असलेल्या भगवान भक्तीगडावर मागील वर्षाचा विक्रम मोडत यावर्षी लाखो लोक उपस्थितीत राहणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या या दसरा मेळाव्याची प्रचंड उत्सुकता असून, सध्याची राजकीय परिस्थितीत दसरा मेळ्याव्यात नेहमी सडेतोड आणि परखड बोलणार्‍या पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे सार्‍या राज्याचे लक्ष लागले आहे…

स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा

महाराष्ट्रात खूप पूर्वीपासून तीन दसरा मेळावा होतात. यात नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा सकाळी होतो. स्वयंसेवक पथसंचलन, कवायती करतात अन् संघ प्रमुखांच्या मनोगताने या मेळाव्याचा समारोप होतो. पूर्वी स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा लाखोंच्या उपस्थितीत दुपारी भगवान गडावर दसरा मेळावा होत असे. सध्या लाखोंच्या उपस्थितीत भगवान भक्ती गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे दसरा मेळावा घेतात. तिसरा दसरा मेळावा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील शिवाजी पार्क येथे सायंकाळी होत असे. सध्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतात… या तिन्ही दसरा मेळाव्याची राज्य नव्हे तर देशभर चर्चा होते.

कर्मभूमी ते जन्मभूमी असा भगवान गड ते भगवान भक्तीगड या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची सुरूवात प्रचंड स्वाभिमानातून झाली… सन- २०१६ च्या दरम्यान भगवान गडाचे महंत न्यायाचार्य नामदेवशास्त्री यांनी भगवान गडावर यापुढे कोणत्याच पक्षाचा राजकीय कार्यक्रम होणार नाही, अशी घोषणा केली.. स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ज्या व्यासपीठावरून दसरा मेळाव्याला संबोधित करायचे ते व्यासपीठ पाडले. भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून वाद झाल्याने 2016 मध्ये पंकजा मुंडे यांना गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला.

स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत झाली नाही पाहिजे अन् भक्ती अन् शक्तीचे प्रतीक असलेला मेळावाही झाला पाहिजे, अशी सामंजस्याची भूमिका घेत पंकजा यांनी २०१७ मध्ये दसरा मेळव्याच्या पूर्वसंध्येला यावर्षीचा दसरा मेळावा भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे होणार असल्याचे जाहीर केले. खरेतर दसरा मेळाव्यासाठी अवघे काही तास राहीले होते. या परिस्थितीत अचानक ठिकाण बदलूनही लाखो लोकांनी बाबांची जन्मभूमी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला हजेरी लावली. यानंतर अवघ्या एका वर्षात भगवान बाबांची जन्मभूमी सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगड नावाने भव्य असे स्मारक पंकजा मुंडे यांनी उभे केले. २०१७ पासून संत भगवान बाबांची जन्ममूमी असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे दसरा मेळावा घेत आहेत.

प्रत्येकवर्षी पंकजा मुंडे समर्थक दसरा मेळाव्यात मागील वर्षीच्या गर्दीचा उच्चांक मोडत आहेत. ऑक्टोबर हीट आणि भर उन्हात होणार्‍या यावर्षीच्या दसरा मेळाव्यात देखील मागील वर्षीच्या गर्दीचा विक्रम मोडला जाणार असल्याचे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमधील उत्साहातून दिसून येत आहे.

Pankaja Munde Dasara Melava : पंकजाताई काय बोलणार?

अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथा- पालथी झाल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडून एक गट विरोधात तर दुसर्‍या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपाचा परंपरागत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत देखील फूट पडली. सत्तेच्या भुकेत पक्षीय विचारधारा गाजराच्या पुंगीप्रमाणे मोडून खाल्ली. यावर पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. ( Pankaja Munde Dasara Melava )

स्वकीयांकडूनच कोंडी

भाजपा पक्षाच्या सर्वात मोठ्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे आहेत. वडिलांचा वारसा म्हणून नव्हे तर त्यांनी स्वत:च्या कार्य- कर्तृत्वातून ते दाखवून दिले आहे. सन २०१४ मध्ये पंकजा मुंडे यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढून ७५ सभा घेतल्या होता. याचा मोठा फायदा भाजपाला झाला अन् युती सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेत आले. दरम्यान पंकजा यांच्याकडे ग्रामविकास, महिला व बालकल्यान, जलसंधारण खाते आले. प्रत्येक खात्याला त्यांनी न्याय दिला. प्रत्येक खात्यातील योजना, उपक्रम, मोहीमा रोल मॉडेल ठरल्या. याचे सर्वत्र कौतुक झाले. अनेक योजनांना केंद्रातील मोदी सरकारने पुरस्कार, मान- सन्मान देऊन गौरव केला. ताईंची जलयुक्त शिवार योजना प्रचंड यशस्वी ठरली अन् याचवेळी त्यांच्याकडून ते खाते काढून घेण्यात आले.यानंतर टप्प्या- टप्प्याने त्यांना ‘लिमिटेड’ केले गेले… खरेतर आता कोणी बोलणार नाही, मात्र तत्कालीन विरोधकांना भाजपाच्या झारीतील शुक्राचार्यांनी मदत करून स्थानिकच्या त्यांच्या ताब्यातील संस्थांना शेकडो कोटी रूपयांचा निधी दिला. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या कारणावरून त्यांना टार्गेट करण्यात आले. ते एवढे की, स्व. लोकनेते मुंडे यांनी ‘स्वाभिमानी बाणा, अन् ताठ कणा’ दिलेल्या वंचित समाजात नवी लिडरशीप तयार करण्याचा प्रयत्न झाला. ( आजपर्यंत सफल झाला नाही) यातून काहींना राज्यसभा, नंतर केंद्रीय मंत्रीपद, काहींना विधान परिषद… परंतू खर्‍या अर्थांने ज्या लोकनेत्याच्या लेकींच्या पाठीशी लोक आहेत, त्या पंकजा अन् प्रीतम यांना केंद्र आणि राज्यात देखील कुठेही स्थान मिळाले नाही. स्वकीयांकडूनच सातत्याने कोंडी झाली असल्याने राज्यातील अठरा पगड जाती धर्मातील मुंडेप्रेमी प्रचंड अस्वस्थ असून दसरा मेळव्यात या सार्‍या परिस्थितीवर पंकजा मुंडे काय बोलणार? याची उत्सुकता राज्याला लागली आहे…

दसरा मेळाव्यात रोखठोक बोलण्याची परंपरा

स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे असो या भाजपा नेत्या पंकजा मुंडे उन्हा- तान्हात राज्यातून लोखोंच्या संख्येने आलेल्या सर्व जाती- धर्मातील समर्थकासमोर मनाच्या आतल्या कोपर्‍यातील भावना, उद्याचे संकेत बोलण्याची परंपरा आहे. २००८ मध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात बोलताना सांगितले, मला गडावरून दिल्ली दिसते. पुढे चार-पाच महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले अन् दिल्लीला गेले. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाची सत्ता. लोकनेते मुंडे केंद्रात ग्रामविकास मंत्री झाले. या दरम्यान चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी ठेवलेल्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकनेते मुंडे यांनी चौंडी येथे जाण्यापूर्वी गोपीनाथ गडावर सभा घेतली अन् तेथे भाषण करताना ‘भगवान गडावरून मला पंकजा दिसते’ असे वक्तव्य केले. यानंतर अवघ्या सहा सात दिवसांनी लोकनेते मुंडे यांचे अपघाती निधन झाले.

दसरा मेळाव्यात पुढे काय? दिशेचा संकेत देण्याची प्रथा आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडे दसरा मेळाव्यातून काय संकेत देतात. भगवान भक्तीगडावरून त्यांना पुढे काय दिसते?, याकडे सार्‍या राज्याचे लक्ष लागले आहे…

हेही वाचा :

 

 

Back to top button