परभणी: सोनपेठ येथे धनगर समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा | पुढारी

परभणी: सोनपेठ येथे धनगर समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा: सोनपेठ तालुक्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, तसेच चौंडी येथील आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणार्थीना पाठिंबा देण्यासाठी सोनपेठ येथे आज (दि.२५) सकल धनगर समाजबांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी सोनपेठ येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. (Parbhani news)

धनगड व धनगर एकच असून राज्य शासनाने याचा अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गात समावेश करून तसे पत्र केंद्र शासनाला पाठवावे. ६ सप्टेंबरपासून चौंडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे सुरेश बंडगर, अप्पासाहेब रूपनर यांच्या आंदोलनाची राज्य शासनाने अद्याप दखल घेतली नाही. या उपोषणाची दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी धनगर समाजाचे नेते सुरेश भुमरे यांनी उपस्थितीत धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या मोर्चात चिमुकल्यासह महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग राहिला. सोनपेठसह पाथरी, परळी तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सोनपेठ तहसीलदार सुनिल कावरखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button