सामान्यांना न्याय देणे न्यायव्यवस्थेचा मूळ उद्देश : सरन्यायाधीश चंद्रचूड | पुढारी

सामान्यांना न्याय देणे न्यायव्यवस्थेचा मूळ उद्देश : सरन्यायाधीश चंद्रचूड

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :  सामान्यांना न्याय मिळवून देणे, हा न्यायव्यवस्थेचा मूळ उद्देश आहे. घटनाकारांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सदसदविवेकबुद्धीला स्मरून न्यायाधीश आणि वकिलांनी योग्य समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी केले.

खंडपीठ प्रशानाच्या वतीने एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात कायदेशीर प्रणाली मजबूत करण्याच्या दृष्टीने न्यायाधीश आणि वकील यांच्यातील सहकार्य कसे वाढवावे, या विषयावर न्या. डॉ. चंद्रचूड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्या. दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूती देवेंद्रकुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूती प्रसन्ना वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूती संजय व्ही. गंगापूरवाला, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूती रवींद्र घुगे, अॅडव्होकेट जनरल डॉ. विरेंद्र सराफ, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष उदय वारंजीकर, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष नरसिंह जाधव, सचिव राधाकृष्ण इंगोले आदी उपस्थित होते.

व्याख्यानाचा प्रारंभ न्या. चंद्रचूड यांनी मायबोली मराठीतून केला. मराठावाड्यातील संत परंपरेचा, विविध धार्मिक स्थळांचा, येथील महान परंपरांचा उल्लेख त्यांनी केला. निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्धच्या लढ्यातील स्वातंत्र्यवीर हुतात्मा यांना आदरांजली अर्पण करीत हजारो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. त्यांच्या त्यागाचे, देशभक्तीचे आणि देशाप्रती निष्ठेचीच फळे आपण चाखतो आहोत. त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचेही त्यांनी सांगितले..

न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारा प्रत्येक घटक हा न्यायव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकावर विशिष्ट जबाबदारी आहे. न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता जपणे सर्वांचेच कर्तव्य आहे. यासाठीच वकील आणि न्यायमूर्तींनी परस्परांचा सन्मान करणे अत्यावश्यक आहे. कोणतेही काम करताना ते सदसदविवेकबुद्धीला स्मरून केले तर उद्दिष्टपूर्ती होते. हाच न्याय न्यायव्यवस्थेलाही लागू आहे. न्यायव्यवस्थेने न्यायदानात आणि संपूर्ण यंत्रणेतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुमारे ३६ हजार निवाडे हे ईएसईआर प्रणालीवर मराठीसह देशाच्या विविध भाषांमध्ये मोफत उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ सर्वच संबंधितांनी घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. ई-फायलिंग, ई-सेवा केंद्र, संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, विधी विद्यापीठे आदी सर्वच न्यायव्यवस्थेसाठीची आवश्यक अंग आहेत, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, की आता तरुण पिढी वकिली व्यवसायात मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यांना वरिष्ठ वकिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. वरिष्ठांनी विधी विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य करून, वेगवेगळ्या परीक्षांसाठी तरुण वकिलांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. आज न्यायव्यवस्थेत महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. तरुण वकिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी, आपला दृष्टिकोन हा व्यापक, वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक ठेवावा, असे सांगितले.

काळा कोट आणि गाऊन हा प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची आठवण करून देतो… विश्वासार्हता हा न्याय व्यवस्थेचा आत्मा आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी समृद्धी सचिन कुलकणी हिने स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. अँड. चैतन्य धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी आभार मानले.

कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूती नरेश पाटील, राजस्थान उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्या. एस. एस. शिंदे यांच्यासह ज्येष्ठ निवृत्त न्यायमूती, ज्येष्ठ विधिज्ञ, वकीलवर्ग, महिला वकील कायद्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

 

हेही वाचा : 

Back to top button