

डोंगरकडा; पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापुर ते कळमनुरी मार्गावर कामठा फाटया जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी दि ११ दुपारी घडली आहे. पिराजी यलप्पा वाघमारे ( ३९, रा. डोंगरकडा) असे मताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील पिराजी वाघमारे हे रस्त्याचे लहान-मोठे कंत्राट घेऊन काम करतात. दुपारच्या सुमारास ते दुचाकी वाहनावर कळमनुरी येथे कामासाठी निघाले होते. आखाडा बाळापूर पासून काही अंतरावर असलेल्या कामठा फाटयाजवळ भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये पिराजी गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार सय्यद अन्सार, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पिराजी यांना तातडीने आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
दरम्यान या अपघातानंतर वाहन चालकाने वाहनासह पळ काढला. पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहून वाहनाचा शोध सुरू केला आहे. मयत पिराजी वाघमारे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार असल्या सांगण्यात आले आहे.