Bail Pola 2023 : बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट; बादलीभर पाण्यात बैलांची आंघोळ | पुढारी

Bail Pola 2023 : बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट; बादलीभर पाण्यात बैलांची आंघोळ

बनकिन्होळा, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यासह बनकिन्होळा व परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. पावसाळ्यात पावसाने म्हणावी तशी जोरदार हजेरी लावली नाही. त्यात पुन्हा काहीशी रिमझिम हजेरी लावून पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे परिसरातील नदी – नाले, ओढे, पाझर तलाव पाण्यावाचून कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. (Bail Pola 2023)

शेतकर्‍यांचा बैलपोळा सण गुरूवारी (दि.१४) साजरा होत आहे. त्यातच बुधवारी (दि.१३) रोजी सर्जाराजाला आंघोळ घालून खांदेमळणी साजरी करण्यासाठी यंदा नदी – नाले, ओढे, तलाव पाण्यावाचून कोरडेठाक पडलेले आहेत. विशेष म्हणजे खांदेमळणीच्या दिवशी बैलांना शाम्पू , साबण लावून पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली जाते. सायंकाळी बैलांची हळद कुंकू लावून व पूजा करून खांदेमळणी साजरी करण्यात येते. (Bail Pola 2023)

मात्र, यंदा जलसाठे पाण्याअभावी कोरडेठाक पडलेले असल्याने बैलांना आंघोळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागली आहे. ज्या विहिरीत थोड्याफार प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी पाणी शोधून सर्जा – राजाला शेतकऱ्यांनी आंघोळ घातली आहे. यंदा बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारातही सजावटीचे साहित्य, साजाची फारशी खरेदी झालेली नाही. ऐन सणासुदीत बाजारपेठेतही फारशी आर्थिक उलाढाल दिसून येत नाही. दुष्काळी स्थितीचा अर्थकारणावरही परिणाम झालेला आहे.

पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडलेला आहे. पावसाला जोर नसल्याने ठिकठिकाणचे नदी -नाले, तलाव, ओढे कोरडे पडले आहेत. यंदा बैलपोळा सण साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. पोळा सणानिमित्त बाजारातही यंदा फारशी खरेदी करण्यात आलेली नाही.

– गुड्डू फरकाडे, शेतकरी, बनकिन्होळा

कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचे गडद सावट पसरत आहे. रब्बी बरोबर खरीप हंगाम आता हातचा गेल्यातच जमा आहे. नैसर्गिक आपत्ती, रोगराई यामुळे शेतकरी पुरता आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना बैल पोळा सण अगदी सध्या पद्धतीने साजरा करण्याची वेळ आली आहे.

– ज्ञानेश्वर भगत, शेतकरी, भायगाव

हेही वाचा 

Back to top button