हिंगोली: पानकनेरगाव येथे गायरानमधील अतिक्रमण काढण्यासाठी रास्ता रोको

हिंगोली: पानकनेरगाव येथे गायरानमधील अतिक्रमण काढण्यासाठी रास्ता रोको

पानकनेरगाव: पुढारी वृत्तसेवा: पानकनेरगाव येथील गायरानमधील अतिक्रमण हटविण्यासाठी आज (दि. ५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, नायब तहसिलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव हद्दीत गट क्रमांक २६३, २६४, ३३०, ३२९, ३२४, २१४, १७४, अशी एकूण ३०० एकर गायरान जमीन आहे. परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, शेकडो वर्षापासून गायरानात गुरे चारत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून गायरान जमिनीवर काहींनी महसूल व ग्रामपंचायतीच्या डोळ्यात धूळफेक करत गायरानातील झाडांची खुलेआम कत्तल केली आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरने नांगरणी करून गायरानमध्ये बेकायदेशीररित्या पिके घेतल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत वर्षभरापासून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, ग्रामपंचायत, प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकरी, ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. १२ सप्टेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिले. परंतु अतिक्रमण न हटविल्यास १३ सप्टेंबररोजी पुन्हा महामार्गावर उतरू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यावेळी सेनगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी रणजित भोईटे, खुदूस शेख, मारकळ, रमेश कोरडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news