Maratha Reservation Protest Jalna: हिंगोलीत सोमवारी बंदचे आवाहन; सेनगावमध्ये कडकडीत बंद | पुढारी

Maratha Reservation Protest Jalna: हिंगोलीत सोमवारी बंदचे आवाहन; सेनगावमध्ये कडकडीत बंद

हिंगोली, सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पुकारण्यात आलेल्या सेनगाव बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्वच दुकाने बंद होती. तर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको केल्यामुळे रिसोड, जिंतूूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. (Maratha Reservation Protest Jalna)

जालना जिल्हयात अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्याच्या घटनेचे हिंगोली जिल्हयात तीव्र पडसाद उमटले आहेत.  सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा मार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर हिंगोली, वसमत या ठिकाणीही निषेध व्यक्त करून या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी हिंगोली बंदचे आवाहन यावेळी करण्यात आले. (Maratha Reservation Protest Jalna)

दरम्यान, आज सेनगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोकाे आंदोलन करण्यात आले. सकाळी दहापासून या आंदोलनाला सुरवात झाली. यामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आले होते. या आंदोलनामुळे हिंगोली-सेनगाव-रिसोड तसेच हिंगोली-सेनगाव-जिंतूर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे अडीच ते तीन तासानंतर महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले.

जालना जिल्हयातील घटनेची चौकशी करून दोषींवर कडक करावाई करावी. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोली आगाराची परभणी येथे गेलेल्या बसवर दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यामुळे आज दुपारपर्यंत हिंगोली आगारातून एकही लांबपल्ल्याची तसेच ग्रामीण भाागासाठी बस सोडण्यात आली नसल्याचे आगाराच्या सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button