हिंगोलीत घरफोडी, चोरट्यांनी २.३५ लाखांचा ऐवज पळविला

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत श्रीकृष्ण नगर भागात चोरट्यांनी रात्रीच्यावेळी कुलुप कोयंडा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २.३५ लाखांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीकृष्ण नगर भागात अलका मोतीराम चव्हाण यांचे घर आहे. मंगळवारी त्या कुटुंबियांसह माहेरी गेल्या होत्या. यावेळी घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी रात्री घराचा कुलुप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले ३० हजार रुपये रोख व ५ तोळे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचा नेकलेस, पाच ग्रॅमचे कानातील झुमके, एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या, असा एकूण २.३५ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता चव्हाण कुटुंबिय घरी आले असतांना त्यांना घराचे कुलुप तुटल्याचे दिसले. त्यामुळे घराची चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घर उघडून पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तातडीने हिंगोली शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, जमादार अशोक धामणे, संजय मार्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी अलका चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मांजरमकर पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :