हिंगोली: कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जन्मठेप | पुढारी

हिंगोली: कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जन्मठेप

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे किरकोळ कारणावरून एकास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (दि. १९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील कुबेरराव हाके हे 25 मे 2021 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घरासमोर दुचाकी उभी करीत होते. यावेळी गावातील शिवराज उर्फ बाळू हाके तेथे आला. त्याने शेतातील धुऱ्यावरील लिंबाचे झाड का तोडले, या कारणावरून कुबेरराव यांच्या मानेवर, गालावर, खांद्यावर पाठीवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. सदर भांडण गावातील महेश हाके हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण झाली.

या प्रकरणी ग्यानोबा कुबेरराव हाके यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून शिवराज उर्फ बाळू हाके याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपनिरीक्षक एच. डी. नकाते यांच्या पथकाने अधिक तपास करून हिंगोलीचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

प्रकरणात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी शिवराज उर्फ बाळू हाके यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सविता देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील ॲड. एस. डी. कुटे, ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी सहकार्य केले.

हेही वाचा 

Back to top button