

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील हिंगोली-परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १ कोटी ३ लाख रूपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी बँकेच्या रोखपालासह तिघांवर बासंबा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.१६) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा तालुक्यातील लाख येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या शाखेत कार्यरत असलेले रोखपाल सतीश गजानन सातव, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव दत्तराव सोपानराव लोंढे, जनार्धन रंगराव तळणकर या तिघांनी मागील चार वर्षापासून खातेदारांनी ठेवलेल्या ठेवीचे बॉण्ड परस्पर तोडून रक्कम उचलून घेतली. तसेच बँकेच्या सिस्टीमला कमी रक्कम दाखवली. यासह इतर खातेदारांची रक्कमही परस्पर उचलली. या प्रकरणात खातेदारांनी माहिती घेतली असता बँक खात्यातील रक्कम तसेच एफडी रक्कम परस्पर काढल्याचे लक्षात आले. त्यानंतर बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने या प्रकरणात चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशीमध्ये तिघांनी १ कोटी ३ लाख ३८ हजार ७५१ रुपये रक्कमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर उपव्यवस्थापक तथा तालुका नियंत्रण अधिकारी दिपक मल्हारराव सरनाईक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एस. चवळी करीत आहेत.
एकुण घोटाळा १ कोटी ७७ लाख ४७ हजारांचा
लाख येथील जिल्हा बँकेत एकूण १ कोटी ७७ लाख ४७ हजार ९०१ रूपयांचा अपहार झाल्याचे चौकशी अंती सिद्ध झाले होते. यापैकी शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी रामराव नथुजी खिल्लारी यांच्यावर ७४ लाख ९ हजार १५० रूपये व रोखपाल सतीश गजानन सातव यांच्यावर १ कोटी ३ लाख ३८ हजार ७५१ रूपये अशी अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी रामराव खिल्लारी यांनी अपहाराची रक्कम भरणा केली आहे. विशेष म्हणजे बँकेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत अंतिम अहवाल येईपर्यंत रक्कम वाढण्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे पोलीसांसमोर या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.