हिंगोली : घरकुलाचा धनादेश काढण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्यास अटक | पुढारी

हिंगोली : घरकुलाचा धनादेश काढण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्यास अटक

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : घरकुलाच्या धनादेशासाठी पाच हजार रूपयांची लाच घेताना वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. ११) रात्री रंगेहाथ पकडले. आठवडाभरातील ही दुसरी कारवाई असून जिल्हाभरातील शासकीय कार्यालयात लाच घेतली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

वसमत तालुक्यातील बोरगाव येथील एका रहिवाशाचे रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा तिसरा हप्‍ता बँकेत टाकण्यासाठी पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता राजेश बालाजी नाईक यांनी मागील दोन हप्त्यांसाठी साडेतीन हजार तर तिसर्‍या हप्त्यांसाठी दिड हजार अशा एकूण पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने शुक्रवारी (दि. ११) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शनिवारी (दि. १२) पडताळणी करण्यात आली. रात्री पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात पंचासमक्ष लाच स्विकारताच राजेश नाईक यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रक्‍कमेसह ताब्यात घेतले. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप-अधिक्षक अनिल कटके यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी केली.

Back to top button