परभणी : २१ दिवसांच्या विश्रांतीनंतर गंगाखेड तालुक्यात पावसाला पुन्हा प्रारंभ
गंगाखेड; प्रमोद साळवे : तब्बल २१ दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवार (दि.१९) दुपारपासून गंगाखेड तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला. पावसाच्या खंडाने मुग, उडीद पिकांचे नुकसान झाल्यानंतर सोयाबीन व कापसाला जीवदान मिळाल्याने बळीराजाची मोठी चिंता तूर्तास तरी दूर झाली आहे. ऊस क्षेत्रात मात्र अद्यापही पूरक पाऊस पडलेला नाही. तालुक्यातील माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्पासह क्षेत्रातील ६ तलाव क्षेत्रांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान शुक्रवारपर्यंत तालुक्यात ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारपासून तालुक्याच्या सर्वदूर कुठे रिमझिम तर कुठे चांगल्या पावसास प्रारंभ झाला आहे. २७ जुलैला शेवटचा पाऊस झाला. नंतर २८ जुलै ते १८ ऑगस्ट या २१ दिवसांच्या कालखंडानंतर पावसाअभावी काळजीत पडलेल्या शेतकऱ्यांना शुक्रवार व शनिवारच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल २१ दिवसांच्या पावसाच्या खंडाने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. पाण्याअभावी मूग व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर किमान सोयाबीन व कापूस तरी हाती यावा, अशी अपेक्षा बळीराजाची आहे.
शुक्रवारपासून तालुक्याच्या सर्वदूर भागात कुठे रिमझिम तर कुठे चांगल्या पाऊसास प्रारंभ झाल्यामुळे सोयाबीन व कापसाला तूर्तास तरी जीवदान मिळाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तालुक्यात ऊसाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे.
२१ दिवसांच्या खंडानंतर तालुक्यात पावसाची शुक्रवार पर्यंतची नोंद ४.०० (३२२) मिमी एवढी असल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून अव्वल कारकून दत्तराव बिलापट्टे यांनी दिली. तर धरण व तलाव क्षेत्रात अद्यापपर्यंत पावसाची विशेष मोठी नोंद झाली नसल्याची माहिती जलसिंचन शाखा क्र.२ चे दिलीप कागणे यांनी दिली.
'मासोळी' गतवर्षी जुलैमध्येच झाले होते 'ओव्हर फ्लो'
यावर्षीच्या पर्जन्यकाळात दि.२८ जुलै ते १८ ऑगस्ट हा २१ दिवसांचा पावसाचा खंड हा तालुक्यातील मासोळी धरणासह लघू व साठवण तलावावर विपरीत परिणामकारक ठरला आहे. मागील वर्षी ७ जुलै २०२२ रोजी मासोळी धरण १०० टक्के भरून 'ओव्हर फ्लो' झाले होते. तर २०२१ साली मासोळी धरण 'ओव्हर फ्लो' होण्यासाठी ७ सप्टेंबरचा दिवस उजाडला होता. सलग दोन वर्षे मासोळी १०० टक्के भरून 'ओव्हर फ्लो' झाले होते. यावर्षी ऑगस्टचा अर्धा महिना उलटला तरी मासोळी धरणात केवळ ११.८०२ पाणीसाठाच शिल्लक असल्याने 'मासोळी'सह तालुका क्षेत्रातील ६ लघु व साठवण तलाव क्षेत्रात मोठ्या पावसाची अपेक्षा बळीराजा ठेवून आहे.
हेही वाचा :

