हिंगोली : वसमतच्या मोंढ्यात हळदीला सोन्याचा भाव, बीटामध्ये दर ३० हजारांवर पोहचला | पुढारी

हिंगोली : वसमतच्या मोंढ्यात हळदीला सोन्याचा भाव, बीटामध्ये दर ३० हजारांवर पोहचला

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : वसमत येथील कृऊबा बाजार समितीच्या मोंढ्यात शुक्रवारी हळदीच्या ८ हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिटात ११ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. यापूर्वीही बिटात हळद २३ हजार रुपयांवर गेली होती. हळदीचे दर ५ दिवसांपासून स्थिर होते. शुक्रवारी झालेल्या बिटात सर्वाधिक ३० हजार व त्यानंतर २५ हजारांचा दर हळदीस मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत आहे.

शुक्रवारी हळदीचे बोली बिट झाले. बिटात हळदीस ११ हजार ते १६ हजार रुपयांचा दर मिळाला. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले (रा दिग्रस) यांच्या दर्जेदार हळदीच्या ६ कट्ट्याला ३० हजार तर शेतकरी मारोतराव पवार (रा. रेडगाव) यांच्या ५१ कट्ट्याच्या लॉटला २५ हजार दर मिळाला. गत पाच दिवसांपासून हळदीचे दर स्थिर होते. शुक्रवारी आवक मोठ्या प्रमाणात झाली. दर्जेदार हळदीस उच्चांकी दरही चांगला मिळाला. यापेक्षाही जास्त दर हळदीस यावर्षी मिळेल, अशी अशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  मोंढ्यात साधारण हळदीस १५ ते १६ हजारांचा दर मिळतो तर दर्जेदार हळदीचे दर उच्चांकी दर गाठत आहेत.

दर्जेदार हळदीच्या दरात उच्चांकी….

शुक्रवारी (दि.४) कृऊबा समिती मोंढ्यातील बिटात दर्जेदार हळदीस सर्वाधिक ३० हजार व २५ हजार दर मिळाला. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री करताना खात्री करावी, असे सभापती तानाजी बेंडे यावेळी यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button