इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : नव्यानेच पदभार स्वीकारल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी येथे भेट दिली. या वाडीला रस्ता नसून फक्त पायवाट आहे. त्यातच पाऊस असल्याने या भागात ओढे, नाले दुथडी भरून वाहत असून डोंगरावरून प्रचंड धबधबे कोसळत आहे. दगड गोट्यांतून ३ ते ४ किलोमीटरचा पायी प्रवास जिल्हाधिकारी शर्मा यांनी करून खैरेवाडी गाठले. (Nashik Collector Jalaj Sharma)
यानिमित्ताने या भागातील आदिवासी नागरिकांच्या व्यथा आणि जन्मोजन्मीच्या दुखण्याची माहिती अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तसेच यानिमित्त पक्का रस्ता आणि विविध शासकीय योजनांचा फायदा येथील नागरिकांना मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. जिल्हाधिकारी शर्मा यांनी महसूल सप्ताह अंतर्गत जनसंवाद कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे ग्रामपंचायत हद्धीतील खैरेवाडी ही अतिशय दुर्गम व आदिवासी बहुल आदिवासी वाडीची निवड केली. (Nashik Collector Jalaj Sharma)
या पाहणी दौऱ्या प्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी रविंद्र ठाकरे, इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदी शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
खैरेवाडी येथील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करून जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. वाडीतील आदिवासी ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या वाडीवर जाण्यासाठी रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईसाठी उपाययोजना करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी हितगुज साधून समस्या व उपायोजना यावर चर्चा करण्यात आली. येथील लोकांकडून आणि अधिकाऱ्यांकडून संजय गांधी योजना, शिधापत्रिका, आधार कार्ड, शेततळे, शैक्षणिक योजना, आदिवासी विकास योजना, घरकुल योजना, इतर विभागांच्या योजना असा सविस्तर आढावा घेण्यात नियोजन करण्यात आले.
हेही वाचा