चिपळूण, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ओमळी येथील निलीमा चव्हाण हिचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर चौकशी करून पोलिसांनी आरोपीला अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शहरातील महाविद्यालयीन युवक, युवतींनी चिपळूण पोलिस ठाण्यावर धडक दिली. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन दिले.
दाभोळ खाडीत चिपळुणातील तरूणीचा विटंबना केलेला मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर जिल्ह्यासह चिपळुणात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता महाविद्यालयीन विद्यार्थीही मागे राहिले नसून एकत्र येत या घटनेचा निषेध केला व पोलिसांना निवेदन दिले. यावेळी समीर शिंदे, कपिल आंब्रे, सिद्धु पवार, मुबीन माटवणकर यासह अनेक तरूण, तरूणी उपस्थित होत्या. दुपारी शहरातील डी.बी.जे., रिगल कॉलेज, गुरूकुल कॉलेज व अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी एकवटले आणि पोलिस ठाण्यात एकत्र येत त्यांनी हे निवेदन दिले. या निवेदनानुसार, २९ जुलै रोजी निलीमा चव्हाण हरवली होती. मात्र, तिचा मृतदेह खाडीत सापडल्याने तिची हत्या झाली आहे, असा संशय येतो. तरी, याची कसून चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.