बुलढाणा : मलकापूरमध्ये २ खासगी बसचा भीषण अपघात; ६ जण ठार, २२ जखमी | पुढारी

बुलढाणा : मलकापूरमध्ये २ खासगी बसचा भीषण अपघात; ६ जण ठार, २२ जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भांडेगाव परिसरातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या खासगी बसला मलकापूर जवळ आज (शनिवार) पहाटे अपघात झाला. या अपघातात ६ जण ठार तर 22 जण जखमी झाले. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर मृतांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्‍यान बस अपघातातील जखमी व्यक्तींची जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेतली व विचारपूस केली. या अपघातात एकूण सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
तालुक्यातील भांडेगाव येथील शिवाजी धनाजी जगताप (वय 55) हे मागील पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी खासगी बसने अमरनाथ यात्रा काढतात. त्यासाठी परिसरातील भाविकांची नोंदणी करून त्यांना यात्रेमध्ये सहभागी करून घेतले जाते. मागील 22 दिवसांपुर्वी त्यांनी यात्रा काढली होती. त्यासाठी भांडेगाव, लोहगाव, जयपूर, डिग्रस कऱ्हाळे, साटंबा या गावातील भाविकांनी नोंदणी केली होती. सुमारे 30 भाविक या यात्रेत सहभागी झाले होते.

अमरनाथ येथून दर्शन घेऊन सर्व भाविक गावाकडे परत येत होते. मात्र मलकापुर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे तीन वाजता त्यांच्या बसला नागपूर येथून नाशीककडे जाणाऱ्या एका खाजगी बसने (एमएच-27-बीएक्स-4466) समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात भाविकांच्या बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अपघातात शिवाजी धनाजी जगताप (55, भांडेगाव), बस चालक संतोष आनंदराव जगताप (38 भांडेगाव) राधाबाई सखाराम गाडे (50, जयपूर), सचिन शिवाजी माघाडे (30 लोहगाव), अर्चना गोपाल घुक्से (30, डिग्रस कऱ्हाळे) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मलकापूर पोलिसांनी सांगितले.

या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये गिताबाई बद्रीनाथ कऱ्हाळे (46 डिग्रस कऱ्हाळे) यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व जखमींना बुलढाणा येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे मलकापूर पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी मलकापूर पोलिसांशी संपर्क साधून जखमींबाबत चौकशी केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button