जागतिक व्याघ्र दिन : वाघांची संख्या वाढली अन् आव्हानेही! | पुढारी

जागतिक व्याघ्र दिन : वाघांची संख्या वाढली अन् आव्हानेही!

29 जुलै 2010 रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत वाघ वाचविणयासाठी उपस्थित देशांनी एक करार केला. या कराराची आठवण म्हणून 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. जगातील अगदी मोजक्याच देशांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे. भारत, चीन, रशिया, सैबेरिया, जावा-सुमात्रा आणि आशियातील काही देशांमध्येच वाघ आहेत. आज भारताला ‘टायगर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळखले जाते. याचे निर्विवाद कारण म्हणजे व्याघ्र प्रकल्प योजना अर्थात ‘प्रोजेक्ट टायगर’चे यश.

1972 च्या व्याघ्रगणनेनुसार भारतात केवळ 1 हजार 827 वाघ शिल्लक होते. वाघांची ही रोडावलेली संख्या आणि वाघ नामशेष होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारत सरकारने 1 एप्रिल 1973 रोजी व्याघ्र प्रकल्प योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 20 वर्षांच्या काळात या प्रकल्पाला चांगले यश मिळाले होते. परंतु, 2006 पर्यंत वाघांची संख्या पुन्हा कमी होऊन 1 हजार 11 इतकी झाली. त्यानंतर पुन्हा गंभीरपणे केंद्र सरकार आणि पर्यावरण खात्याने प्रोजेक्ट टायगर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. 10 एप्रिल 2023 रोजी म्हैसूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार भारतात 3 हजार 167 वाघांची नोंद करण्यात आली आहे. व्याघ्र प्रकल्पांचे यश हे केवळ देशासाठी नव्हे तर जगासाठी अभिमानाची बाब आहे.

व्याघ्र प्रकल्पाच्या 50 वर्षांचा आढावा घेताना त्यामध्ये अनेक चढ- उतार पाहावयास मिळतात. गेली 10 लाख वर्षे वाघ हा प्राणी पृथ्वीवर आहे. जीवाश्मांच्या आधारे वाघ पूर्व प्लाईस्टोसीन आणि प्लाईस्टोसीन काळात म्हणजेच 10 लाख वर्षांपूर्वीच्या काळात होता असे सिद्ध झाले आहे. चीन, उत्तर कोरिया, जावा, भारत या ठिकाणी वाघांचे अवशेष सापडले आहेत. भारतात समुद्रगुप्ताच्या काळात म्हणजेच इ. स. 325-50 मध्ये सुवर्णमुद्रांवर व्याघ्र पराक्रम कोरलेला आहे. 19 व्या शतकापर्यंत सैबेरियापासून ते दक्षिण आशिया आणि मलेशियन द्वीपसमूहापर्यंत वाघांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात होते. परंतु, नंतर साम्राज्यवादाच्या काळात वाघ अनेक देशांतून नामशेष झाले.

1973 नंतर म्हणजेच प्रोजेक्ट टायगर योजना राबवल्यानंतर वाघांच्या संवर्धनासाठी भारताने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. तत्पूर्वी, भारत सरकारने 1970 मध्ये वाघांच्या शिकारीवर कायदेशीर बंदी घातली. तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ. करणसिंह आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘प्रोजेक्ट टायगर’साठी योगदान दिले.

50 वर्षांनतंर देशात एकूण 38, तर महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. 2006 पासून (1411) आजपर्यंत (3167) देशातील वाघांची संख्या वाढत आहे. परंतु वाघांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांच्या संवर्धनासाठी असलेली आव्हानेही वाढली आहेत. वाढलेल्या वाघांच्या संख्येसाठी नवीन अधिवास, त्या अधिवासाचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव संघर्ष या आव्हानांवर मात यापुढील काळात करावी लागेल.

आज 35 टक्के वाघ हे संरक्षित जंगलाबाहेर म्हणजे बफर झोन बाहेर आहेत आणि त्यांचा मानवाशी संपर्क वाढत आहे. व्याघ्र संवर्धनातील ही एक प्रमुख समस्या आहे. तसेच वाघांच्या स्थलांतरासाठी आवश्यक असलेल्या कॉरिडॉरचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वन खात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांमुळे हे साध्य झाले आहे; मात्र जागेच्या कमतरतेमुळे संरक्षित क्षेत्रातील वाघ हे लगतच्या परिसरात स्थलांतर करीत आहेत. सहाजिकच मानव-वाघ संघर्ष गेल्या काही वर्षांत वाढला आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या नजीकच्या गावांत हा अनुभव वारंवार येत आहे. वाघांनी आता गावांलगतचा, वर्दळीचा अधिवास स्वीकारला आहे. म्हणूनच वाघांच्या अधिवासाचे नव्याने व्यवस्थापन करावे लागत आहे.

– प्रा. डॉ. राजेंद्र पोंदे

Back to top button