परभणी : भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संतोष मुरकुटे यांची वर्णी | पुढारी

परभणी : भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संतोष मुरकुटे यांची वर्णी

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) गंगाखेड तालुक्याचे भूमिपुत्र संतोष मुरकुटे यांची वर्णी लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून परभणी जिल्हा भाजपच्या राजकारणावर गंगाखेड तालुक्याची छाप अखेर यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

भाजपचे प्रदेश सदस्य संतोष मुरकुटे यांची मागील काही महिन्यांपासून जिल्हाध्यक्षपदी ग्रामीण पदावर वर्णी लागणार असल्याचे संकेत भाजपच्या राज्य सूत्रांकडून मिळाले होते. राज्यात मागील महिनाभरात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यभरातील भाजपच्या जिल्हाध्यक्षांची निवड लांबणीवर पडली होती. आगामी काळात परभणी लोकसभा व परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने मुरकुटे यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत होणार आहे.

राजकीय पार्श्वभूमी : संतोष मुरकुटे यांनी २०१९ ची गंगाखेड विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवत २२ हजार मते मिळविली होती. त्यानंतर मुरकुटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे ते आगामी गंगाखेड विधानसभेचे उमेदवार म्हणून भाजपच्या अनेक वरिष्ठ नेते व प्रदेश कार्यालयाकडून त्यांना पाठबळ दिले जात आहे.

गंगाखेड तालुक्याला सहाव्यांदा जिल्हाध्यक्षपदाचा मान

गंगाखेड तालुका हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. संतोष मुरकुटे यांच्या रूपाने गंगाखेड तालुक्याला परभणी जिल्हाध्यक्ष पदाचा तब्बल सहाव्यांदा मान मिळाला आहे. या अगोदर स्व. श्यामसुंदर मुंडे (चार टर्म), श्रीराम मुंडे, अभय चाटे (दोन टर्म), विठ्ठलराव रबदडे व डॉ.सुभाष कदम हे जिल्हाध्यक्षपदी राहिले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button