महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. तर लिंगमळा परिसर देखील जलमय झाल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारी रात्री आंबेनळी घाटात पोलादपूर नजीक ठिकठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्प आहे.
महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून शहर व परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. आजही जोरदार वाऱ्यासह पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच आहे. महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाबळेश्वर-पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. दरम्यान संततधार पावसाने बुधवारी वेण्णालेक महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर ठिकठिकणी जलमय रस्त्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महाबळेश्वर – पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. संततधार पावसाने वेण्णालेकच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
हेही वाचा :