नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: यमुना नदीला आलेल्या पुरामुळे दिल्ली जलमय झाली आहे. त्यातच तीन पाणी प्रकल्प बंद पडले असून, पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. पाणी पातळी वाढतच असून, शहरातील अनेक भाग जलमय झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आयटीओ, निगम बोध घाट, सिव्हिल लाईन्स, जैतपूर आदी भागात पूरस्थिती गंभीर आहे. ऐतिहासिक लाल किल्ला परिसराला पाण्याचा विळखा पडल्याच्या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व खात्याने शुक्रवारी लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय (Delhi flood news) घेतला आहे.
दिल्लीतील पाऊस थांबला असला तरी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यांत पावसाने हाहाकार उडवला आहे.
हथिनी कुंड बॅराजमधून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने दिल्लीत यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. वझिराबादमध्ये पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यमुना बँक मेट्रो स्थानक तात्पुरते बंद करण्यात आले आहे. मयूर विहार फेस १ भागात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचे मुख्यालय असलेल्या आयटीओ भागापर्यंत पाणी (Delhi flood news) अडवले आहे.
पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शास्त्री पार्क, खजुरी पुश्ता, खजुरी खास आदी भागांत तीन किलोमीटर अंतर कापण्यासाठी लोकांना चार तास घालवावे लागले. पुरामुळे वझिराबाद, चंद्रावल तसेच ओखला पाणी प्रकल्प बंद पडल्याने काही भागांत पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. नदीतील पाण्याची पातळी २०८.४६ मीटरवर गेली असल्याची माहितीही त्यांनी दिली. पूर क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
हवामान खात्याने दिल्लीसह बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने पहाडी राज्यांतील स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.