हिंगोली : प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने तरुणाकडून तहसीलदारांना धमकी | पुढारी

हिंगोली : प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने तरुणाकडून तहसीलदारांना धमकी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील तहसील कार्यालयाकडून नातेवाईकाचे उत्पन्नासंदर्भातील प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने एका तरूणाने थेट तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यासह तहसीलदारांना ‘पाहून घेतो’ अशी धमकी दिली. दीपक गंगाधर गुठ्ठे रा. बेलूरा (ता.हिंगोली) असे या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१३) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

बेलूरा येथील दीपक गंगाधर गुठ्ठे हा तरुण त्याच्या नातेवाईकाचे उत्पन्नाच्या बाबतीतले प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात आला होता. नातेवाईकास रुग्णालयात दाखल करण्यासाठी तहसीलदारांचे उत्पन्नाच्या बाबतीतले प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अर्ज देखील दिला होता. मात्र वारंवार चकरा मारूनही तहसील कार्यालयाकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, बुधवारी दुपारी तो तहसील कार्यालयात आला. त्यानंतर त्याने कर्मचारी शुभेंद्र जारे यांना प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. यावेळी जारे हे काही बोलण्याच्या आतच दीपक याने त्यांना तसेच इतर कर्मचार्‍यांना दमदाटी केली. त्यानंतर त्याने थेट तहसीलदार नवनाथ वागवाड यांच्या कक्षात जाऊन प्रमाणपत्रा बाबत विचारणा केली. यावेळी तहसीलदार वागवाड यांनी प्रमाणपत्रासाठी लागणार्‍या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा त्यानंतर लगेच प्रमाणपत्र देतो असे सांगितले. त्यावर दीपक याने तहसीलदारांना पाहून घेतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी कर्मचारी शुभेंद्र जारे यांनी बुधवारी रात्री उशीरा हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दीपक गुठ्ठे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button