

पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलत्या राजकारणाला मी कंटाळलाेय. मंत्रीपदाचा मला हव्यास नाही, असे स्पष्ट करत मी माझी भूमिका १८ जुलै रोजी जाहीर करणार आहे, अशी माहिती प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज (दि. १३) पत्रकार परिषदेत दिली. आपण सध्या तरी आपली साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्ताराला विलंब हाेत असल्याने माजी मंत्री बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा हाेती. त्यानंतर बुधवारी यावर आपली नाराजी व्यक्त करत सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सहभागी हाेण्याच्या मुद्यावर अप्रत्यक्ष टीकाही केली हाेती. सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता अशा बदलत्या राजकारणाला मी कंटाळलाे आहे. आता काेठे तरी या राजकारणाला स्थिरता येणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मला पदाची हाव नाही. मला कोणतेही पद नको आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मला नेहमीच पाठबळ राहिले. त्यांच्या काळात राज्यात दिव्यांग मंत्रालय सुरु झाले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे काहीही देणेघेणे नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय सुरु केले यासाठी मी कायमस्वरुपी त्यांचा आभारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी १७ जुलै रोजी भेटीला बोलवले आहे. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतरच १८ जुलै रोजी मी माझी भूमिका जाहीर करणार आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :