Buldhana Bus Accident :  बुलढाणा बस अपघात घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद : नितीन गडकरी | पुढारी

Buldhana Bus Accident :  बुलढाणा बस अपघात घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद : नितीन गडकरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात घडला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकून उलटली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २६ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे तर सातजण सुखरुप आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी “बुलढाणा बस अपघात घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद” असं ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. (Buldhana Bus Accident)

माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे सिंदखेडराजा परिसरात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसचा भीषण अपघात घडला. अपघातानंतर बसने पेट घेतला. अपघात एवढा भीषण होता की, २६ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर सातजण सुखरुप आहेत. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ही बस नागपूरहून पुण्याला जात होती. बसमधील बहुतांश प्रवासी यवतमाळ, वर्धा, नागपूर येथील होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकल्याने प्राथमिक माहितीत स्पष्ट झाले आहे.

Buldhana Bus Accident : पाच लाखांची मदत

बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. “झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ८ लोक जखमी आहेत. मी आयजी आणि कलेक्टर यांच्याशी बोललो आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.”

घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद : नितीन गडकरी

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे, अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत.

हेही वाचा 

Back to top button